अस्मितादर्श परिवाराचा आधारवड ः डॉ. गंगाधर पानतावणे

डॉ. मिलिंद बागूल
Saturday, 27 June 2020

नवनव्या पिढीतील उभरत्या नवोदित अशा लेखकांना आपल्या मार्गदर्शनातून घडविणारे पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दलित साहित्यासंदर्भात "अस्मितादर्श' रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले. आज (28 जून) प्रा. डॉ. पानतावणे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्याविषयी... 

नवनव्या पिढीतील उभरत्या नवोदित अशा लेखकांना आपल्या मार्गदर्शनातून घडविणारे डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी दलित साहित्यासंदर्भात "अस्मितादर्श' रोपट्याचे एका वटवृक्षात जे रूपांतर केले, त्या वटवृक्षाच्या सावलीत आमच्यासारखी लिहणारी आणि सरांना अनुभवणारी मंडळी खूप आहे. वर्षानुवर्षांपासून चालणारी "अस्मितादर्श'ची संमेलने, त्या संमेलनाला दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी, प्रत्येक वर्षी आपल्या जिल्ह्यात अस्मितादर्श संमलन व्हावे, यासाठी कार्यकर्ते आणि लेखकांचा होणारा आग्रह, याचे सारे श्रेय डॉ. पानतावणे सरांना जात असायचे. त्यांच्या अविरत अशा लिखाणातून आणि मार्गदर्शनातून जुन्या- नव्या पिढीच्या विचारांची आदानप्रदानता होत असे. दलित साहित्याचा प्रवाह प्रवाहीत होण्यासाठी डॉ. पानतावणे सरांनी ज्या उत्साहाने, उमेदीने "अस्मितादर्श' अनियतकालिक चालवले, त्यामुळे नवे लिखाण, विद्रोह, संयम, वास्तवता समाजापुढे येत आहे. नव्या पिढीला इतिहासाची माहिती होऊन वर्तमानात जगताना, लिहिताना भविष्याचे योग्य असे लक्ष्य ठेवता येत आहे. 

डॉ. पानतावणे सरांच्या मनस्वी स्वभाववैशिष्ट्य मांडताना हे निश्‍चितपणे आपल्या लक्षात येईल, की सर प्रत्येक लहान-थोर मंडळींचा आदर करत, पुत्रवत प्रेम करत, आशीर्वाद देत आणि रागावतदेखील. त्यांच्या मनाला ज्या काही गोष्टी खटकल्या अथवा योग्य वाटल्या नाहीत, तर ते अगदी मनापासून रागावत आणि या रागावण्यात प्रेमळपणादेखील असायचा. त्यांच्या रागावण्यातून व्यक्त होणारा भाव हा निश्‍चितच आपलेपणाची जाणीव करून देणारा असायचा. अनेकदा त्यांच्या रागावण्यातून काही मंडळी दुखावली जायची. अनेकांना सरांच्या रागावण्याचा किंवा त्यांच्या वागण्याचा प्रत्ययही आलेला आहे; परंतु वटवृक्षाची ही सावली अनेकांना अर्थात साऱ्यांनाच हवीहवीशी वाटतच असायची. दलित साहित्यिकांत, त्याबरोबरच मराठी साहित्यातही त्यांचा "शब्द' हा "प्रमाण' मानला जात असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना जे लिहिते केले, ते विसरता येणार नाही.

अनेकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजावून देण्याचे कार्य डॉ. पानतावणे सरांनी आजतागायत केले. भारतातल्या अनेक राज्यांत आणि भारताबाहेरही त्यांच्या वैचारिकतेला, त्यांच्या साहित्यविषयक चळवळीला अनुसरणारा मोठा वर्ग आहे. "अस्मितादर्श' हा एक परिवार असून, या परिवाराचे कुटुंबप्रमुख डॉ. पानतावणे सर होते. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडताना त्यांना कधी प्रेमळ, तर कधी कठोर व्हावे लागत असे. त्यांच्या जगण्याचा श्‍वास भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचार आहे आणि तो विचार पेरण्यासाठी डॉ. पानतावणे सर सतत महाराष्ट्रभर दौरे करीत असत. नव्या पिढीच्या नवलेखकांना प्रोत्साहित करीत असत. त्यांना मार्गदर्शनाबरोबरच आपल्या लेखणीची वाट फक्त नि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनाच अनुसरून असली पाहिजे, असा त्यांचा जाणीवपूर्वक आग्रह असे. त्यांच्यातला लेखक, समीक्षक, विचारवंत, तळागाळातल्या, उपेक्षित समाजव्यवस्थेतल्या लेखकांनाच शोधत असे. त्या शोधण्यातून दलित साहित्यिक घडत गेलेला दिसून येतो. अस्मितादर्शने कविता, कथा, लेख छापला म्हणजे नवलेखकाला, साहित्यिकाला ते मोठं बक्षिस मिळाल्याचा आनंद होत असे. "अस्मितादर्श'चा अंक प्रकाशित होईपर्यंत सरांची चाललेली मेहनत अनेकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी अशीच होती; त्याचबरोबर आत्मचिंतनाचीदेखील गरज वाटल्यावाचून राहत नसे. 

आपल्या लेखनाला डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आदर्शव्रत प्रेरणा असल्याने आपला विचार मागे पडू शकत नाही, आपले लेखन अन्याय- अत्याचाराच्या, धर्मांधतेच्या आणि शोषणाच्या विरोधात सतत लढा देत राहील, असा विचार घेऊन दलित साहित्याची पिढी घडविणाऱ्या डॉ. पानतावणे सरांनी "अस्मितादर्श' परिवाराला एकसंध ठेवले. नव्या- जुन्या लेखक, कवींना एकत्र आणत, विचारांची बांधणी करीत समाजव्यवस्थेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न सरांनी नेहमीच केला. कौटुंबिक आणि शारीरिक व्याधींचादेखील विचार न करता सर सतत डॉ. बाबासाहेबांचा विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. सामाजिक भान जपत परिस्थितीचे गांभीर्य नव्या पिढीच्या लक्षात ते आणून देत. विचारांची लढाई विचारांनी लढावी, आपले विचार आपण समृद्ध करीत दलित साहित्याची असणारी स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्याचा सरांचा नव्या पिढीला असणारा संदेश महत्त्वपूर्ण असाच आहे. सरांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांमधून समाज जोडण्याचे काम केले. नवतरुणांची शक्ती डॉ. बाबासाहेबांच्या विचारांकडे वळविण्याचे जे वेगळे असे कार्य केले, त्यातूनच चळवळीला गतिमानता आलेली दिसून येते. 

"अस्मितादर्श'ने गेल्या अनेक वर्षांपासून केलेली वाटचाल अतुलनीय अशीच आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था बदलवून टाकण्यासाठी नव्या पिढीला अशा व्यवस्थेविरुद्ध लेखणी धारदार करण्यासाठी डॉ. पानतावणे सरांनी "अस्मितादर्श'च्या माध्यमातून जो पुरोगामी विचार रुजविला आणि त्यातून मिळालेली विचारसरणी अन्यायाच्या विरोधात बंड करण्याची विचारधारा, स्वाभिमानी वृत्ती, नवनव्या पिढ्या आत्मसात करताना आजही दिसत आहेत. प्रिंट मीडिया आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या काळातदेखील सरांनी केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी बाब आहे. आज दलित साहित्य अधिकाधिक प्रभावीपणे पुढे आलेले दिसून येते. मराठी साहित्याच्या पुढे जाणाऱ्या दलित साहित्याच्या प्रवाहात डॉ. पानतावणे सरांचा सिंहाचा वाटा आहे. रोजच्या रोज अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात. या पुस्तकांमध्ये दलित साहित्याची पुस्तके अधिकाधिक संख्येने असलेली दिसून येतात. 

दलित साहित्यातील अनेक लेखक, कवींना आपल्या पुस्तकाला प्रा. डॉ. पानतावणे सरांची प्रस्तावना असावी, असे नेहमीच वाटे. सरांनी पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेअगोदर ते पुस्तक पूर्णतः वाचलेले असायचे. त्यांच्या वाचनाचा आणि बैठकीचा विचार खरेतर अनेक लेखक, कवींनी केला पाहिजे. त्यांच्या वाचनातून लेखक, कवींच्या ज्या काही उणिवा आहेत, तसेच त्याबरोबरच लेखनातल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सुटू शकत नसत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, तसेच लेखनाचा लेखक, कवी, साहित्यिकांवर पडणारा प्रभाव खऱ्याअर्थाने दलित साहित्याला समृद्ध करणारा असाच आहे. 

डॉ. पानतावणे सरांनी महाराष्ट्रभर आपला गोतावळा निर्माण केला. या गोतावळ्यात सारी लहान-थोर मंडळी आहे. 10 ऑक्‍टोबर 1968 पासून आजपर्यंतची "अस्मितादर्श'ची वाटचाल ही अनेकांना आश्‍चर्यचकित करणारी अशीच आहे. दलित साहित्यनिर्मितीला, नवनव्या पिढीला घडविणारी आणि वैचारिकतेचे पाठबळ देणारी "अस्मितादर्श चळवळ' डॉ. पानतावणे सरांच्या वैचारिक जडणघडणीतूनच वाटचाल करीत असते. वाचन आणि लेखनाची परंपरा "अस्मितादर्श'ने ज्या पद्धतीने सुरू केली, ती पद्धत आजही नव्या पिढीतला दलित साहित्य वाचणारा युवक- युवती लेखनाकडे आपसूक वळताना दिसून येतो. 

खरे म्हणजे डॉ. पानतावणे सरांनी म्हटल्याप्रमाणे "अस्मितादर्श' हे आंबेडकरवादाचे अपत्य आहे. आंबेडकरी विचार रुजविणे, आंबेडकरी विचारांची मशागत करणे आणि आंबेडकरी विचाराला विकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्ती खणून काढणे, हीच "अस्मितादर्श'ची परिक्रमा आहे. आंबेडकरवाद ही "अस्मितादर्श'ची प्रतिज्ञा आणि जीवनदृष्टी आहे. (आंबेडकरवादी समीक्षी रुपे, पृष्ठ 23) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अस्मितादर्श दलित जाणिवा समजून घेणाऱ्या आणि वास्तववादी भूमिका घेणाऱ्या साऱ्यांमध्ये पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आणि शिक्षणाचा भक्कम अशा पायऱ्या पार करीत व्यक्तिमत्त्वाला मजबूत करणाऱ्या पिढीसाठी डॉ. पानतावणे सर पितामह आहेत, हे नाकारता येणार नाही. 

अनेक वर्षांनुवर्षांपासून सरांनी अनेक पिढ्या घडविल्या. देशभरात "अस्मितादर्श'ची संमेलने भरविली. दरवर्षी नवनवीन लेखक, कवी "अस्मितादर्श'च्या परिवारात सामील होतात. सरांच्या स्वभावाची आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे आणि हे वर्तुळ दिवसेंदिवस अधिकाधिक गोलाकार होत जाताना दिसून येते. "अस्मितादर्श'ने अनेक लेखक, कवी घडविले. बरीचशी मोठीही झाली. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात ते आपल्या लेखणीने सडेतोड उत्तरेही देऊ लागली. त्यांच्या नावाला नावलौकिकदेखील प्राप्त झाला; परंतु त्यातली काही "अस्मितादर्श'ला विसरू लागली. सरांनी अशांनाही माफ केले. उलटपक्षी अनेकांनी "अस्मितादर्श'ला ऊर्जाकेंद्र संबोधले आणि या ऊर्जेतून डॉ. आंबेडकरांचा विचार होऊन नव्या दमाने लिहिणाऱ्या लेखण्या बळकट होताना आजही दिसत आहेत. 

डॉ. पानतावणे सरांनी जी वाट वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना निर्माण करून दिली, त्या वाटेवरून अनेक पिढ्या घडल्या, घडत आहेत, घडत जातील, याबद्दल शंकाच नाही. त्यांना ऐकताना, वाचताना, त्यांच्याशी चर्चा करताना दलित चळवळीविषयीची त्यांची अगतिकता महत्त्वाची वाटते. त्यांचा विचार "अस्मितादर्श' अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article jalgaon Support of Asmitadarsh ​​family: Dr. Gangadhar Pantawane