esakal | तायपिंग अन्‌ संपूर्ण शांतता! 
sakal

बोलून बातमी शोधा

Galwan

"तायपिंग' या चिनी शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण शांतता; परंतु चिनी "तायपिंग' आणि भारताच्या "संपूर्ण शांतता' या शब्दांचा अर्थ जरी एकच असला, तरी चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांसाठी या शब्दांचा संदर्भ वेगळा आहे. चीनशी जुळवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी चीन साम्राज्यवादी भूमिका सोडणार नाही; एव्हाना हे भारताचे लक्षात आले असेल. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी या कालखंडात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले, तरी चीनची लक्ष्ये बदलणार नाहीत. मध्येच केव्हातरी चीन "तायपिंग'ची आश्वासने देतो, तरी भारताने मात्र चीनला अपेक्षित असलेली "तायपिंग' घडू न देता आपल्याला हव्या असलेल्या "संपूर्ण शांतते'वर लक्ष दिले पाहिजे. 

तायपिंग अन्‌ संपूर्ण शांतता! 

sakal_logo
By
शरद पंडितराव पाटील

"तायपिंग' या चिनी शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण शांतता; परंतु चिनी "तायपिंग' आणि भारताच्या "संपूर्ण शांतता' या शब्दांचा अर्थ जरी एकच असला, तरी चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांसाठी या शब्दांचा संदर्भ वेगळा आहे. सहा जूनला लेफ्टनंट जनरल पातळीवर भारत- चीनच्या सैन्याधीकार्यांत बैठक झाली. तीत दोन्ही देशांनी आपले सैन्य एक किलोमीटर मागे घ्यावे, असे ठरले होते. यानुसार पंधरा जूनला भारतीय सैनिक गलवान क्षेत्रात चिनी सैन्य एक किलोमीटर मागे सरले आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी गेले असता तेथे त्यांना चीनने भारताच्या हद्दीत उभारलेला टेहळणी मनोरा दिसला. यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला चढविला. या चकमकीत भारताचे वीस जवान शहीद झाले, तर चीनचे चाळीसपेक्षा अधिक सैनिक मारले गेल्याचे म्हटले जात आहे. 

चीनचे परराष्ट्र धोरण पाहता, चिनी सैनिकांचा भारतीय सैनिकांवर हल्ला, ही अचानक व तत्कालिक कारणास्तव घडलेली घटना नाही, असे दिसून येते. भारताला विश्वासात घेऊन, गाफील ठेवून सर्वकाही उत्तम आहे, असे वातावरण तयार करायचे व नंतर सीमेवर कुरापत काढायची, ही चीनची रणनीती आहे. 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वुहान येथे भेट दिली होती. पंतप्रधानांचे भव्य स्वागत तेथे करण्यात आले. भारत- चीन मैत्रीचे नवे पर्व सुरू होते आहे, असे वातावरण तयार करण्यात आले. यानंतर 2019 मध्ये जी जिनपिंग हरत भेतीर महाबलीपुरम येथे आले असता, भारत- चीन संबंध अधित वृद्धिंगत होतील, असे म्हटले जाऊ लागले. यानंतरही अधिकारी, सचिव व सैन्यस्तरावर चीनसोबत संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वहिताचे संरक्षण अधिक महत्त्वाचे असते, हे चीनने दाखवून दिले. खरेतर जी जिनपिंग महाबलीपुरम येथे आले होते, तेव्हाच भारताशी संघर्ष करण्याची नीती चीनने आखली होती, असे वाटते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जो संघर्ष उद्‌भवला, त्याला पाच मेपासून भारत- चीन सीमेवर होत असलेल्या चकमकींची पार्श्‍वभूमी आहे. मेमध्ये भारताच्या गलवान, हॉट स्प्रिंग, पेंगोंग त्सो, ग्रोग्रा या भागात चीनने सैन्याची जमवाजमव सुरू केली होती. हे भाग आधी वादग्रस्त म्हणून परिचित नव्हते; परंतु चीनने या भागात घुसखोरी केल्यानंतर आपले तळ ठोकले आहेत, तसेच आधीपासून सीमालगत भागात पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. 

चीनने आताच भारतीय हद्दीत घुसखोरी का केली? 
भारत- चीन सीमावाद आणि त्याअनुषंगाने सीमेवर होणाऱ्या चकमकी, चिनी सैन्याने भारतीय हद्दीत येणे, या घटना काही नव्या नाहीत म्हणून चीनने आताच भारतीय सैनिकांवर हल्ला करून सीमावाद तापवायला का सुरवात केली, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक ठरते. चीनच्या परराष्ट्र धोरणात आता "वुल्फ वॉरिअर' या धोरणाचा समावेश चीनच्या मुत्सद्यांनी केला आहे. या धोरणानुसार चीनला जाचक ठरणारे मुद्दे आणि देश यांना कठोरतेने मोडीत काढायचे, असे धोरण आहे. याच धोरणाचा अवलंब करून चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चीन पुढील कारणासाठी "वुल्फ वॉरिअर' धोरणाच्या माध्यमातून भारतावर दबाव वाढविण्यासाठी सीमावाद तापवितो आहे. 

1. 1959 मध्ये पाकिस्तान- चीनने चीनमधील शिनजीयांग ते दक्षिण तिबेट यांना जोडणारा काराकोरम महामार्ग बांधला. आता हाच महामार्ग पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान व बलुचिस्तानमार्गे अरबी समुद्रातील ग्वादार बंदराला जोडला जात आहे. त्याला एक महाकाय "इकोनॉमिक कोरिडोर'चे स्वरूप देण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. या प्रकल्पासाठी चीनने कोट्यवधी डॉलर्स गुंतविले आहेत. या प्रांतात हजारो चिनी मजूर, अभियंते आणि चिनी सैनिकांची उपस्थिती आहे. गलवान- अक्‍साई चीन आणि चीन- पाकिस्तान इकोनॉमिक कोरिडोर (CPEC) मधील क्षेत्र आहे. 2014 नंतर भारताने चीनच्या सीमेजवळ वेगाने पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा धडाका लावला आहे व वेगाने रस्तेबांधणीचे (Strategic Rodes) काम हाती घेतले आहे. कलम- 370 रद्द करून भारताने जम्मू- काश्‍मीर एक स्वतंत्र राज्य बनविले व लडाख केंद्रशासित प्रदेश बनवला. यामुळे चीन सावध झाला. यानंतर पाकव्याप्त काश्‍मीर ताब्यात घेण्याची चर्चा भारतीय माध्यमांमध्ये होऊ लागली. गिलगीट- बाल्टीस्तानमधील प्रदेशांतील हवामान प्रसारित करण्यास भारताने सुरवात केली. पाकव्याप्त काश्‍मीर भारताने बळाने परत घेण्याचा प्रयत्न केल्यास काराकोरम महामार्ग व पर्यायाने चीन- पाकिस्तान "इकोनॉमिक कोरिडोर' जो चीनचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे व ज्यावर चीनने कोट्यवधी डॉलर्स गुंतविले आहेत, तो धोक्‍यात येईल, याची चीनला चिंता वाटू लागली. यास्तव या क्षेत्रात भारतीय सैन्याच्या उपस्थितीमुळे चीनला असुरक्षित वाटते. 

2. भारताच्या हद्दीत असलेल्या गलवानच्या खालच्या बाजूस असणाऱ्या डीबीओ दौलतबेग ओल्डी (डीबीओ) या प्रदेशात भारतीय लष्कराची कायम उपस्थिती असते. या भागात भारताची लढाऊ विमाने, रणगाडे आदी आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी गलवान क्षेत्र चीनला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे वाटते. 

3. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आला. ही बाब चीनने बरेच दिवस दडवून ठेवली व चिनी पर्यटक, प्रदेशात कामानिमित्त जाणारे चिनी नागरिक कोरोना विषाणू इतर देशांत पसरवू लागले. संपूर्ण जग चीनच्या चुकीमुळे कोरोनाच्या विळख्यात आल्याने व बहुतांश देशांत टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली. जगभरात चीनविरोधी वातावरण तापू लागले. खुद्द चीनमध्ये कोरोना महामारीमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला, बेरोजगारी वाढली. चिनी शासकांनी जगभरात व आपल्या नागरिकांसमोर लाखो डॉलर्स खर्चून तीव्र प्रचाराच्या आधारे चीनची अतिशय प्रगत, शक्तिशाली प्रतिमा तयार केली होती, ती ढासळू लागली. यास्तव चिनी नागरिकांचे व जगाचे लक्ष या मुद्यावरून भरकटविण्यासाठी भारत- चीन सीमावादाचा मुद्दा चीनने तापवायला सुरवात केली आहे. यातून मुख्यत: दोन उद्देश साध्य करण्याचा चीनचा मानस आहे. त्यात पहिला चिनी नागरिकांचे मनोबल उंचावणे, चीनमधील बेरोजगारी, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करणे व देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून शी जिनपिंग व त्यांच्या धोरणांविषयी नागरिकांचे समर्थन प्राप्त करणे. दुसरा मुद्दा हा, की जगात चीनची ताकद दाखवून दरारा निर्माण करणे. जेणेकरून जे देश कोरोना मुद्यावरून चीनच्या चौकशीची मागणी करीत आहेत, त्यांना चाप बसेल. तसेच भारतावर दबाव आणणे. कोरोना मुद्यावरून चीनची चौकशी करण्याची मागणी ज्या देशांनी केली आहे, त्यात भारताचादेखील समावेश आहे. याखेरीज जागतिक राजकारणात चीनला शह देण्यासाठी "क्वाड' ही भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांची आघाडी उदयास येत आहे. भारताने "क्वाड'चा भाग बनू नये यासाठीही चीन गलवानमध्ये आपली ताकद दाखवून दबाव टाकत आहे. 

चीनविरोधात भारताकडे असलेले पर्याय 
गलवान खोऱ्यात घडलेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत- चीन संबंध अधिकच दुरावतील. चीनच्या या धाडसाला भारताने आक्रमकतेने; परंतु रणनीतीच्या आधारे शह देणे आवश्‍यक आहे. चीनची ताकद व कमजोरी ओळखून धोरणे आखावी लागतील. 

1. सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की चीनची खरी शक्ती आहे उद्योग- व्यवसायातून निर्माण होणारा धनसंचय. चीनचा जागतिक व्यापार जगाच्या 12.4 टक्के आहे; जो जगात सर्वाधिक आहे. चीन जगाला कच्चा माल, स्वस्त मनुष्यबळ व मोठी बाजारपेठ पुरवितो. यास्तव जगभरातील उत्पादन क्षेत्रातील उद्योग चीनमध्ये त्यांच्या मालाचे उत्पादन करतात. जगभरातील या उद्योगांनी भारतात गुंतवणूक केली, तर चीनची आर्थिक ताकद कमी होईल व भारताची वाढेल. कोरोना जगभरात थैमान घालत असताना चीनने युरोपातील व भारतातील शेअर बाजारातील मूल्य घसरलेले उद्योग विकत घेण्याची धडपड चालवली आहे. यामुळे जगभरात चीनची विश्वासार्हता कमी झाली आहे व चीनमधील इतर देशांचे उद्योग चीनबाहेर पडण्याच्या विचारात आहेत. याकडे भारताने संधी म्हणून पाहिले पाहिजे व चीनमध्ये बस्तान बसविलेल्या उद्योगांना भारतात आकर्षण्यासाठी उद्योगस्नेही धोरणे तत्काळ राबविली पाहिजेत. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असेल, तरच चीनला रोखणे शक्‍य होईल. 

2) चीन आणि पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांशी भारताचे वैर आहे. पाकिस्तानसोबतच्या तीन युद्धांत भारताने विजय मिळविला असला, तरी भविष्यात चीनकडून होणारा धोका पाहता, सैन्याच्या आधुनिकीकरणाची नितांत आवश्‍यकता आहे. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा भारत जगातील तिसरा देश आहे; परंतु भारताचा संरक्षणावरील खर्च & 71.1 बिलियन डॉलर व चीनचा संरक्षणावरील खर्च $ 261 बिलियन डॉलर्स यांची तुलना केल्यास दोन्ही राष्ट्रांतील अंतर स्पष्ट होते. भारत लष्करासाठी जो खर्च करतो, त्यात निवृत्त सैनिकांचे पेन्शन आणि भत्तेदेखील सामाविष्ट आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारताला वेगाने काम करणे आवश्‍यक आहे. खासगी उद्योगांची मदत याकामी घ्यावी लागणार आहे. ज्या परदेशी कंपन्या भारताला लष्करी साहित्य विकतात, त्यांना "मेक इन इंडिया' धोरणांतर्गत सवलती देऊन भारतात उत्पादन करावे यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. तसेच या लष्करी साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना भारतीय कंपनीशी भागीदारी करण्याची अट ठेवल्यास लष्करी साहित्य निर्माण करण्याचे तंत्रज्ञान व प्रशिक्षण भारतीय कंपन्यांना मिळेल. याशिवाय "डीआरडीओ'ने उत्तम दर्जाच्या लष्करी साहित्याचे निर्माण कमी वेळात करावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; परंतु यासाठी बाबूशाही व लालफितीचा कारभार यांना फाटा द्यावा लागेल. शस्त्र आयातीखेरीज भारताने आता शस्त्र निर्यातीकडेदेखील भारताने लक्ष द्यायला सुरवात केली आहे. 2015 ते 2017 या काळात भारताची शस्त्र निर्यात 700 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पुढील पाच वर्षांत $ 5 बिलियन डॉलर्सची शस्त्र निर्यातीचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. भारतासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

3) दक्षिण चीन समुद्रात व हिंदी महासागरात चीनचा वाढत असलेला दबदबा लक्षात घेता, या प्रदेशांतील राष्ट्रे धास्तावलेली आहेत. ही राष्ट्रे जसे जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया यांच्याशी भारताने लष्करी करार करणे आवश्‍यक आहे. नुकताच भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार भारत व ऑस्ट्रेलियाची लढाऊ जहाजे एकमेकांचे नाविक तळ वापरू शकणार आहेत. हा चीनला शह देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. असेच करार इतर राष्ट्रांसमवेतदेखील होणे आवश्‍यक आहे. भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्या "क्वाड' ग्रुप चीनला अटकाव करू शकतो. चीनला तुल्यबळ प्रतिस्पर्धी आशियात निर्माण करण्यासाठी अमेरिका भारताला मदत करत आहे; परंतु चीन- भारताची सीमा एक आहे. यास्तव आपण आपले सावध राहिलेले बरे. 

चीनशी जुळवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी चीन साम्राज्यवादी भूमिका सोडणार नाही; एव्हाना हे भारताचे लक्षात आले असेल. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी या कालखंडात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले, तरी चीनची लक्ष्ये बदलणार नाहीत. मध्येच केव्हातरी चीन "तायपिंग'ची आश्वासने देतो, तरी भारताने मात्र चीनला अपेक्षित असलेली "तायपिंग' घडू न देता आपल्याला हव्या असलेल्या "संपूर्ण शांतते'वर लक्ष दिले पाहिजे. 

(लेखक आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत.)