... तर, आम्ही भारतीय!

... तर, आम्ही भारतीय!

प्रजासत्ताक दिन साजरा करताना देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे. जाती-धर्मात विखुरण्याऐवजी भारतीय असल्याचा अभिमान झळकू दे.


सुमारे तीस-बत्तीस वर्षे झाली. शेजारच्या दोन कुटुंबांबरोबर आम्ही सिंगापूरला गेलो होतो. श्रद्धा लहान असल्यामुळे मी जाण्यास घाबरतच होते. पण नातेवाइकांपेक्षाही जवळची असणारी दोन कुटुंबे सोबत असल्यामुळे आम्ही जाण्याचे धाडस केले.
तिथे गेल्यावर सर्वत्र एसी होता. सवय नसल्यामुळे श्रद्धा सतत रडत होती. कुणीतरी आम्हाला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. सरकारी दवाखान्यात आम्ही गेलो. रात्री साधारण दहा वाजता आमचा नंबर लागला. तेव्हा तेथील सरकारी दवाखाने रात्री बारा वाजेपर्यंत उघडे असतात, असे समजले. आमच्या शेजारी दवाखान्यामध्ये अकरा ते बारा वर्षांचा एक मुलगा नंबर लावून बसला होता. बरे नसल्यामुळे त्याला उलटी आली. त्याच्या आईने चटकन पुढे होऊन हाताच्या ओंजळीत त्या मुलाची उलटी झेलली आणि "डस्टबिन'मध्ये टाकली. तेथे सर्वत्र जागोजागी सुंदर आकाराची डस्टबिन असतात व ती कोणी पळवत नाहीत. दवाखान्यातील कर्मचाऱ्याकडून फडके घेऊन ती जागा संपूर्ण स्वच्छ केली. आपल्याकडे आपण सरकून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला अस्वच्छतेबद्दल नावे ठेवतो.

पुढे युरोप तसेच अमेरिकेत गेलो. "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'च्या बाहेरच्या बाजूस असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती गोलाकार लोखंडी पट्ट्यांच्या जाळ्या होत्या. (बर्फ वितळल्यानंतर पाणी मिळावे, तसे झाडांच्या मुळांना हानी होऊ नये म्हणून असाव्यात.) तिथल्या लोखंडी जाळ्या कोणीही भंगारवाला चोरून नेत नाही. कळालेली गंमत अशी, की तेथे कोणी भंगार विकत घेतच नाही. पण आपल्याकडे पाहा, गटाराची झाकणे, छोट्या झाडांसाठीचे ट्री-गार्ड, सार्वजनिक ठिकाणचे नळ, बसथांब्यांचे पत्रे, एवढेच नाहीतर जमिनीतील गाडलेल्या वायर्सही खोदून पळवतो. नंतर दूरसंचार विभाग आणि महानगरपालिकेच्या नावाने ओरडायला मोकळे! तिकडे पाळीव कुत्र्यांची घाणही कुत्र्याचा मालक काढून पिशवीत स्वतःकडे ठेवतो आणि पुढे कचरापेटीमध्ये टाकतो. इकडे आपण घरात घाण करू नये म्हणून बाहेर रस्त्यावर कुत्र्याला फिरायला नेतो. तिकडे युरोप-अमेरिकेत ठराविक वारीच विशिष्ट कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरावा लागतो. पण येथे ओला व सुका कचराही वेगळा करण्याची तसदी आम्ही घेत नाही.

एखादी निर्भयासारखी घटना घडल्यावर मूक मोर्चे काढतो. मेणबत्या लावतो. पण तेच आम्ही एखाद्या पीडितेला लग्नाचा आधार देण्याऐवजी टोचून टोचून आत्महत्येला प्रवृत्त करतो. अंदमानला गेल्यावर विमानतळावर स्वातंत्र्यवीर सावकरांच्या नावाची पाटी वाचून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. "सेल्युलर जेल!' जेथे सर्व प्रांतांचे व सर्व धर्मांचे स्वातंत्र्य सैनिक नरकयातना भोगत होते. सेल्युलर जेलमधील "शो' बघताना आपल्या स्वातंत्र्यवीरांचे ब्रिटिशांनी कसे हाल केले होते, ते बघून स्तब्ध व निःशब्द होतो. एकाच वेळी तीन-तीन जणांना फाशी द्यायची जागा बघून मुके होतो. वाय आयलॅंडवर विंचवाच्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना सोडत असत आणि त्यांच्या यातना पाहताना ब्रिटिश स्वतःची करमणूक करून घेत असत. ती जागा बघून व सर्व ऐकून आमचा मेंदू बधिर होतो.

पण हे सगळे तेवढ्यापुरतेच. तेथून व्यावहारिक जगात परतल्यावर आम्ही पुन्हा बदलून पहिल्यासारखे होतो. आम्ही देशासाठी, समाजासाठी काही करणार नाही. पण आम्हाला सर्वच चांगले फुकटात हवे. फुकटात उत्तम देणारे ते आमचे. मग त्यासाठी सरकारने कर्ज काढोत किंवा देश विको, आम्हाला त्याचे काही देणेघेणे नसते. आम्हाला फक्त आणि फक्त सर्व फायदेच हवेत. परत देशावर कर्जाचा बोजा आहे म्हणून ओरडणारेही आम्हीच! आमच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आम्हाला जराही पर्वा नाही. देशासाठी सीमेवर रोज मरणाऱ्या तरुण जवानांचीही आम्हाला फिकीर नाही. आमच्या पोळीवर कसे तूप जास्तीत जास्त पडेल याचीच आम्हाला काळजी.
या भूमीत जन्माला येणारा प्रत्येक जीव, माणसे व जनावरे, किड्या-मुंग्यासुद्धा भारतीयच आहेत; पण जाती-धर्माच्या भीतीने आम्हीच आमचा परीघ छोटा करून घेतला आहे. आम्ही आमच्या नेत्यांना, सामाजिक नेत्यांना छोटे बनवत आपापल्या जातीत बंदिस्त केले आहे. ज्यांनी देशाचे नेतृत्व केले, त्यांना आम्ही एका जातीचे बनवले. आमच्या व्यक्तिगत अस्मिता टोकदार बनवल्या.

दिल्ली येथील "लोटस टेंपल'मध्ये सर्वांनी एकत्र बसून आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयाची असते. आम्हाला आमचा धर्म आपल्या घरात ठेवता येणार नाही का?
भारत टीकला तरच आम्ही व आमचे जाती- धर्म टिकणार आहेत. याचे साधे भानही आम्हाला नाही. मी जिंकण्यापेक्षा आम्ही जिंकण्याचा आनंद घेऊन पाहू. जातीत गुंतून पडण्यापेक्षा देशाचा अभिमान बाळगू. माणुसकीचा धर्म एकमेव मानू. तरच आपण चीनच्याही पुढे जाऊन जगात खऱ्या अर्थाने महासत्ता बनू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com