सहवास सुखाचा

मेघना कालेकर
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

प्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो.

प्रत्येकाला सहवास हवा असतो. सहवासाने एखादा फुलतो, तर एखादा करपतो. एखाद्यासाठी सह-वास सु-वास होतो.

सुटीनंतर मुलीला तिच्या होस्टेलला सोडायला गेलो. सगळे मित्र-मैत्रिणी, शिक्षिका व इतर सहकारी वर्ग भेटल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिक्षिका म्हणाल्या, ""सर्वांना एकमेकांच्या सहवासाची सवय झाली आहे, त्यामुळे सुटी कधी संपते असे होते.'' खरेच आहे. "सहवास' प्रत्येकाला हवा असतो. प्रवासामध्येसुद्धा आपण आपले शेजारी कोण आहे, कोठे चालले आहेत, याची जुजबी माहिती तरी घेतोच. सहवासामुळे आपली सर्वांगीण वाढ होत असते. आपल्याला पैलू पडत जाऊन परिपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार होत असते, पण सहवास कसा व कोणाचा आहे, ते पण महत्त्वाचे असते. चांगल्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा सहवास कोठूनही, केव्हाही मिळाला तर चांगलेच असते. आपल्या आयुष्यात कधी कोणाचा, कसा सहवास घडून येतो हे कधी कधी कळून येत नाही. चुकीच्या सहवासामध्ये हातात शस्त्रे धरणारे व योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर शस्त्रे टाकून निरामय आयुष्य जगणारे लोक वेगळेच.
पंढरपूरच्या वारीला निरपेक्ष वृत्तीने चालत जाणारे वारकरी पाहून त्यांच्या सहवासाची ऊर्जा मिळावी म्हणून इतरेजनही त्यात सामील होतात. योग्य सहवास स्वतःबरोबरच इतरांचे आयुष्य उजळून टाकतो, पण कधी कळते, की योग्य सहवास हा केवळ देखावाच होता. ते केवळ छळ-कपटच होते, तेव्हा मात्र मन करपून जाते. चांगल्या सहवासाने बंदीजनांना तुरुंगाचेही नंदनवन झाल्याचे आपण चित्रपटांतून पाहिलेले आहे. प्रत्यक्षपणे त्याचा अनुभवही घेतो. पण चुकीच्या व कपटी सहवासाचा परिणाम कायमचा मनाच्या तुरुंगात बंदी करून टाकतो. फुलांचा सुगंधी सहवास, एखाद्या चांगल्या कलाकृतीच्या सहवासाचा अनुभव मन प्रसन्न करून टाकतो. नाटक, चित्रपट, संगीत वा इतर कोणतीही कलाकृती आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. पुस्तकांचा सहवास तर न मागता मिळालेले वरदानच. प्रत्येकाचे ठराविक श्रद्धास्थान असते. भले ते व्यक्ती, वस्तू वा एखादे स्थळ असेल, पण त्यांच्या सहवासाने आयुष्य परिपूर्ण होत जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meghana kalekar write article in muktapeeth