प्रवेशाचा प्रवास

मोहन साळवी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बहिणीला सरळ प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळण्याची समस्या पस्तीस वर्षांपूर्वीही आजच्या सारखीच होती.

बहिणीला सरळ प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळण्याची समस्या पस्तीस वर्षांपूर्वीही आजच्या सारखीच होती.

घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचे कृपाछत्र हरवलेले. आम्ही बहीण-भावंडे शिक्षणामध्ये खंड पडू देत नव्हतो. बहीण बारावी उत्तीर्ण झाली. घराजवळच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला. प्रवेश यादीत तिचे नाव नव्हते. मी व बहीण प्राचार्यांना भेटलो. त्यांनी जागा पूर्ण भरल्याचे कारण सांगून प्रवेश देण्यास नकार दिला. थोडी चौकशी केली, तेव्हा बहिणीपेक्षा कमी गुण असलेल्या मुलांना प्रवेश मिळाल्याचे समजले. आम्ही पुन्हा प्राचार्यांना भेटलो व ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या वेळी ते आमच्यावर भडकले व आम्हाला बाहेर हाकलले.

संध्याकाळी कामावरून परतताना आंबेडकर पुतळ्यासमोर एक सभा चालू होती. ती सभा गरीब, कष्टकरी मजुरांच्या समस्येविषयी होती. त्यामधील एका नेत्याच्या भाषणाने मी प्रभावीत झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर गेल्यावर "टेलिफोन डिरेक्‍टरी'मधून त्यांचा पत्ता शोधून काढला. रजा घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्या नेत्यानेच दार उघडले. त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला आत बोलावून बसवले. मी त्यांना सर्व परिस्थिती सविस्तरपणे सांगितली. त्यांच्या टेबलावर मला शाहू महाराजांचे पुस्तक दिसले.

ते पाहून मी म्हणालो, ""शाहू महाराजांची शक्ती, महात्मा फुल्यांची भक्ती व बाबासाहेबांची युक्ती पाहून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेव्हा आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत.'' हे ऐकल्यावर ते उठले. माझ्या डोक्‍यावर हात ठेवून म्हणाले, ""तुला मी एक आहुती देतो. त्या आहुतीने बहिणीला प्रवेश मिळून जाईल.'' थोड्या वेळाने माझ्या हातात चिठ्ठी लिहिलेले पाकीट दिले आणि पुणे विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना भेट, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात कुलगुरूंना भेटलो. ते पाकीट दिले. थोड्या वेळाने शिपायाने एक बंद पाकीट माझ्या हातात दिले व महाविद्यालयात जाण्यास सांगितले. ते पाकीट प्राचार्यांना दिले आणि माझ्या बहिणीला प्रवेश मिळाला. ज्यांच्यामुळे बहिणीला प्रवेश मिळाला ते कुलगुरू होते, डॉ. राम ताकवले व नेते होते भाई वैद्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohan salvi write article in muktapeeth