जेव्हा घरी चोर येतो!

muktapeeth
muktapeeth

तो आवाज मधूनच एकदम यायचा. शेवटी चक्क बागेत जाऊन दिवे लावून पाहून आले. काहीच दिसले नाही

खूप जुनी घटना आहे. मुले शाळेत जायची त्या वेळची. आम्ही "अटीरा'च्या परिसरातील एका क्वार्टरमध्ये राहत होतो. अहमदाबाद येथील वस्त्रोद्योग संशोधन संस्थेचा हा परिसर अत्यंत रमणीय होता. या भरपूर झाडी असलेल्या वस्तीत सर्वत्र नीरव शांतता असे. एखादा अस्सल मुंबईकर आमच्याकडे आला की संध्याकाळ झाल्यावर चक्क थोडासा बावरूनच जायचा! त्यातून आमचा क्वार्टर अगदी टोकाला, एका बैठ्या घरांच्या ओळीत शेवटचा. भोवताली हिरवळ व झाडी.

मुले लहान असल्याने घरात सतत खेळणी, कपडे, पुस्तके इत्यादींचा पसारा असायचा. दिवसभर तो आवरून संध्याकाळपर्यंत मी ही अगदी दमून कातावून जायची. त्यातून अहमदाबादचा तो कुप्रसिद्ध उकाडा! रात्रीची जेवणे कशीबशी एकदाची उरकून, मुलांना दामटून झोपवून कधी एकदा अंथरुणात पडते असे व्हायचे.

त्याही दिवशी अशीच रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास झोपायला गेले. रात्रीचा एक-दीडचा सुमार असावा. मला आमच्या खोलीजवळ "खस खस' असा आवाज यायला लागला, जणू काही बाहेरच्या हिरवळीवर कोणी तरी दबक्‍या पावलांनी चालत आहे. नंतर असेही वाटलं की मुलं काहीतरी खुडबुड करताहेत. पण हळूच उठून पाहिलं तर बिचारी गाढ झोपेत होती. जवळजवळ अर्धा-पाऊण तास असाच गेला. घाबरून नाही नाही ते विचार डोक्‍यात यायला लागले. जवळ एखादी लाठी वगैरे ठेवायला हवी होती का? (जणू काही ही "राणी लक्ष्मीबाई' त्या चोराशी दोन हात करणार होती!) शेवटी न राहवून मिस्टरांना उठविले : त्यांची झोप सदाच गाढ असल्याने त्यांना "तो' आवाज ऐकू आलेलाच नव्हता! उठल्यावरही सुरुवातीला थोडा वेळ त्यांना ऐकूच येईना. ती खसखस ऐकल्यावर ते खिडकीजवळ जाऊन आले, सर्व घरभर फिरून आले. त्यांनी छतावरील पंख्यांची गती पण कमी-जास्त करून पाहिली. पण तो आवाज मधूनच एकदम यायचा व परत बंदही व्हायचा! शेवटी चक्क बागेत जाऊन "दिवे लावून' पाहून आले. काही दिसले नाही व खसखस चालूच राहिली. शेवटी देवाचे नाव घेऊन झोपायचे ठरविले.

दिवस उजाडल्यावर सर्व प्रथम घरभर फिरून आले. मुले सुखरूप होती. सगळ्या वस्तू जेथल्या तेथे होत्या; सारे काही आलबेल. हाऽऽश! जीवात जीव आला. नंतर दोघा मुलांना उठवून तयार करून शाळेत धाडले. हे पण कामावर गेले. नेहमीप्रमाणे कामाची बाई आली. तिला रात्रीचा प्रकार सांगितला; पण तिला ही हे "रहस्य' उलगडले नाही. ती आपली नेहमीप्रमाणे केरवारे करू लागली. आमच्या खोलीतला कचरा काढताना ती एकदम ओरडली, "बाई, चोर सापडला!' आणि मीही तिच्या सुरात सूर लावून ओरडलेच, "अगंबाई, कुठे गं?' अन तिने आमच्या पलंगाखालून एक फुगा काढून दिला. काडीला बांधलेला या फुग्यात आवाज येण्यासाठी बारीकबारीक खडे घातलेले असतात. मुलांचा तो फुगा हवा कमी झाल्याने घरंगळत जाऊन नेमका आमच्या पलंगाखाली अडकला होता. पंख्याच्या वाऱ्याने जमिनीवर डावी-उजवीकडे हलत होता अन्‌ त्यामुळेच रात्रभर मधूनमधून तो खस खस आवाज येत होता.
संध्याकाळी जेव्हा दोघा मुलांना ही त्यांच्या फुग्याची चित्तरकथा सांगितली, तेव्हा त्यांचीही मस्त करमणूक झाली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com