छोटा गुरू 

भारती शहा 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

घरातच छोटा गुरू मिळाला. तोच सध्या मोबाईल वापरण्यापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत सारे शिकवत असतो.

आम्हाला शिकवणाऱ्या बाईंना वंदन केले आणि घरी निघाले. गुरूंना वंदन करणे हा सहज संस्कार आहे आपल्यावर. मनात तोच विचार. घरी आल्यावरही गुरू, गुरुवंदना असेच विचार मनात सुरू होते. मनात आले, आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे गुरू भेटतात. लहानपणी आपले आई-वडीलच आपले गुरू असतात. आई ही पहिली गुरू असेच मानले गेले आहे. जे आपल्याला बोलायला शिकवतात, हात धरून चालायला शिकवतात, समाजात उठाबसायला शिकवतात, ते आई-वडील आपले गुरू. शाळेत शिक्षक गुरू असतातच, पण त्या अल्लड वयात मैत्रिणीही गुरू असतात, नाही बनतातच. त्यांचा हात धरून झोपाळ्यावाचून झुलायला लागतो आपण. नंतर पती सांगेल तसेच वागत जातो आपण. 

आता वयाच्या पासष्टीला मला एक नवीन गुरू सापडला आहे. माझा नातू आदित्य. स्मार्टफोन कसा वापरायचा हे त्यानेच शिकवले. शाळेतून आला की बसून शिकवायचा. तेही चिकाटीने. कारण कधी माझा व्हॉट्सॲप बंद व्हायचा, तर कधी मेसेज करताना चुकायचे, तर कधी मोबाईलच बंद. ‘‘अगं आजी, असे नाही, असे बटण दाब.’’ असे हे एकच नाही तर किती गोष्टी तो आम्हा दोघांना शिकवतो. ऑनलाइन खरेदी कशी करायची, पेटीएम कसे वापरायचे, मोबाईलवर गाणी कशी ऐकायची, टीव्हीवर रेकॉर्डिंग कसे करायचे, इंटरनेट कसे पाहायचे, सगळ्यांचा तोच गुरू. मला ओला-उबेर टॅक्सी कशी बुक करायची हेही त्याने शिकवले. त्यामुळे माझी फार सोय झाली आहे. अशा कितीतरी गोष्टी शिकवतो तो आम्हाला. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आमचा हात धरून तरुण पिढीबरोबर चालायला शिकवतो. आम्हा दोघांचा तो गुरूच आहे की! मग मीही ठरवले, या गुरूला आपण भेट द्यायची. त्याच्यासाठी मस्तपैकी टी-शर्ट व फुटबॉल घेऊन आले. अरे, आमचा छोटा गुरू काय खूष झाला म्हणताय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukatpeeth article by bharti shah