मुकी बिचारी...

रेणुका दर्शने
Tuesday, 7 January 2020

बैलांनी उसाच्या गाड्या अजून किती काळ ओढायच्या? मंदावल्या पायांवर किती काळ मार सहन करायचा?

उसाने भरलेल्या बैलगाड्या मागोमाग उभ्या होत्या. रस्ता चढाचा. बैलांच्या पाठीवरचे ओझे पाहून गलबलून आले. चढावर ते ओझे ओढताना त्यांचे पाय तिरपे झाले होते. तोंडातून फेस येत होता. थांबले की पायावर फटकारे. ते गरीब, मुके जनावर वेदनेने पाय एकदम वरती उचले आणि जिवाच्या आकांताने गाडी ओढे. कधी तो कारखाना येणार आणि त्यांची सुटका होणार? परत दुसऱ्या दिवशी तेच कष्ट, त्याच यातना. खरे तर, त्या बैलगाडीतले ओझे ट्रकमध्ये, टॅक्टरवर टाकले तर पंधरावीस मिनिटांत ऊस कारखान्यात जाईल. मग त्या मुक्या जनावरांना का त्रास द्यायचा? मन विषण्ण झाले. संध्याकाळी घरी आलो. गाडीतून प्रवास करूनही, रस्त्याची चाललेली कामे, खड्डे, ऊन, रहदारी यातून दिवसभर झालेल्या प्रवासामुळे शरीर थकले होते. कधी चार घास खाऊन अंथरुणावर पाठ टेकू असे झाले होते. मनात आले, ते ओझी वाहणारे बैल अजूनही जुंपलेलेच असतील. दिवसरात्र हेलपाटे करत राहतील. मार खात राहतील. 

हंगाम संपेपर्यंत हेच घडत राहील. आपण अंग दुखले, डोके दुखले तर वेदनाशामक घेतो. त्या बिचाऱ्यांनी काय करायचे? त्यांचे दुखणे कुणाला कळणार? गूळ, साखर आपण खातो, ही मुकी जनावरे वाळलेला कडबा, उसाचे ताटे खातात आणि आपल्यासाठी राबराब राबतात. कशासाठी माणूस त्यांना एवढे कष्ट व यातना देतो? स्वार्थासाठीच ना? वर्षातून एकदा बैलपोळा साजरा केला की झाले? ‘मानसा मानसा कधी व्हशील रे मानूस?’ आपण यावर काही तोडगा काढू शकतो का? त्या बैलांची यातून सुटका होऊ शकते का? त्या माणसांना कुणी हे समजावून सांगेल का? त्यांना ट्रक, ट्रॅक्टर विनामोबदला पुरवले तर ते त्यातून उसाची वाहतूक करतील का? आपण काही प्रयत्न करू शकू का? मुक्या प्राण्यांना मारहाण करणे हा गुन्हा ठरत नाही का? भूतदयेचे गोडवे गाणारे आपण सर्व इकडे लक्ष का देत नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth article renuka darshane