घाटातील काळोखी वाट 

मकरंद कापरे
सोमवार, 26 मार्च 2018

साधारण वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पण आठवली, की अजूनही अंगावर काटा येतो. आपलं नशीब बलवत्तर म्हणून त्या वेळी संकटात सापडलो नाही.

मी  तेव्हा इंजिनिअर म्हणून एका दिल्लीच्या कंपनीमध्ये काम करत होतो. कंपनीची अनेक  ठिकाणी कामे चालू होती. हिमाचल प्रदेशमध्ये पोंटासाहिब येथे माझी नेमणूक होती. माझा एक सहकारी मसुरीमध्ये होता. डेहराडून मार्गे पोंटासाहिब ते मसुरी हे अंतर साधारण तीन तास होते. पण दोघेही कामामुळे भेटू शकत नव्हतो. एक दिवस शनिवार-रविवार असे पाहून त्याच्याकडे जायचे ठरवले. शुक्रवारी रात्री पोचायचे आणि शनिवार, रविवारी मसुरी पाहून परत यायचे असे ठरवले. शुक्रवारी दुपारी डेहराडून पाहून मग मसुरीला जायचे ठरवले. दुपारी एक वाजता जेवण करून निघालो. डेहराडूनला लष्करी प्रशिक्षण केंद्र आणि बाकीची प्रेक्षणीय स्थळे पाहून संध्याकाळी सहाच्या सुमारास मसुरीची बस पकडली. मसुरीला साडेसातपर्यंत पोचू अशी अपेक्षा होती. मी मित्राला दूरध्वनीवरून तसे कळविले. 

डेहराडून सोडल्यानंतर अर्ध्या तासातच बस घाट चढत असताना झटके देऊ लागली. एका माणसाने ड्रायव्हरला विचारले, ‘‘क्‍या हुआ भाई?’’ ड्रायव्हरने सांगितले, ‘‘घाट है ना थोडा, लोड ले रही है!’’ बस साधारण शंभर मीटर अंतर कापल्यानंतर धाडकन काहीतरी मोठा आवाज येऊन थांबली. ड्रायव्हर खाली उतरून पाहून आला आणि म्हणाला, ‘‘बस साईड में लेना पडेगी, पाटा टूट गया है!’’ पाटा म्हणजे इंजिन आणि गियरमधला रॉड तुटला होता. मग आम्ही काही जणांनी मिळून बस ढकलून रस्त्याच्या कडेला नेली. मी कंडक्‍टरला विचारले, ‘‘सरदारजी कितना टाईम लगेगा.’’ सरदार दाढीवर हात फिरवत म्हणाला, ‘‘ये काम तो यहा नहीं होगा, बस वापस डेहराडून लेके जानी होगी, ड्रायव्हर आगे जाके फोन करके ब्रेक वॅन बुला लेगा.’’ तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. ड्रायव्हरने बाईकवरून येणाऱ्या एका माणसाची जवळच्या गावापर्यंत लिफ्ट घेतली. इतर लोक कंडक्‍टरच्या मागे लागली की, दुसरी बस करून दे म्हणून. सात वाजत आले होते. ना ड्रायव्हर आला होता, ना दुसरी बस. जंगल असल्यामुळे थोडी थंडी पण वाजायला लागली होती. साडेसात वाजता दुसरी बस आली. आम्ही सर्व जण देवाचे आभार मानून बसमध्ये चढलो. मग मसुरीजवळ आल्यावर मी कंडक्‍टरला विचारले की, हॉटेल ‘मसुरी पॅलेस’ वर जायचे आहे. तो म्हणाला, ‘‘आप फाउंटन चौक में उतर जाओ, वहा से करीब ही है.’’ साडेआठ वाजता फाउंटन चौकात उतरलो. मित्राने मला उतरल्यावर फोन करायला सांगितले होते. पण आजूबाजूला पीसीओ बूथ दिसत नव्हता. दुकानेही बंद झाली होती. मग थोडे पुढे गेल्यावर एक दुधाचे दुकान उघडे दिसले. तिथल्या माणसाला विचारले. तो म्हणाला, ‘‘वापस फाउंटन चौक में जाओ, वहां से बाये, घाट के रास्ते सीधे जाने के बाद बाए बाजू में ही है.’’ अजून एक घाट, अरे बापरे, मला थंडीतसुद्धा घाम आला होता. मी त्याला विचारले, ‘‘इथून काही रिक्‍शा नाही मिळणार का?’’ ‘‘आता मिळणे कठीण आहे.’’ मी परत फाउंटन चौकात आलो. त्याने सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूच्या रस्त्याने चालायला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. चंद्र अधेमधे ढगातून डोकावत होता. थोड्या वेळाने मागून येणाऱ्या गाडीचा प्रकाश जाणवला. मी बाजूला थांबून हात करायला लागलो. पण ती कार न थांबताच निघून गेली. कारच्या प्रकाशात दरीमधून आलेली झाडे खूपच भयानक दिसत होती.

मी वर पाहिले, चंद्र ढगातून बाहेर येत होता. मी म्हटले, हॉटेल येईपर्यंत चंद्रप्रकाश राहिला तर बरे होईल. बाजूच्या जंगलातून रातकिड्यांचे भयानक आवाज येत होते. चंद्र ढगांच्या पांघरुणातून बाहेर आला होता. त्या प्रकाशात रस्त्याच्या कडेची भिंत आणि झाडी स्पष्ट दिसत होती. मी घड्याळात पाहिले. मी पाऊण तास चालत होतो. माझा रस्ता तर चुकला नाही ना? पण मध्ये कोणताही फाटा लागला नव्हता. थोडे चालल्यानंतर पुढच्या वळणावर झाडामागून येणारा दिव्यांचा प्रकाश दिसला. मग चालण्याचा वेग वाढविला. हॉटेल स्पष्ट दिसत होते. मी हॉटेलच्या आत प्रवेश केला आणि तिथे सोफ्यावर माझी वाट पाहात बसलेला माझा मित्र रामा राव धावतच माझ्याजवळ आला. आमची गळाभेट झाल्यावर त्याने विचारले, ‘‘एवढा उशीर कसा झाला?’’ जेवताना त्याला सगळा प्रवासाचा किस्सा सांगितला. सकाळी आम्ही नाश्‍ता करताना, तिथल्या व्यवस्थापकाने विचारले, ‘‘आप कल रात फाउंटन चौक से चलकर आये, ऐसा सुना.’’ ‘‘हो, मला रिक्षा मिळाली नाही.’’ ‘‘हम लोग रातमें कभी चल के नहीं आते, गाडीसे जानेका भी टालते हैं, घाट में दो-तीन मर्डर हुए हैं, कभी कभी लुटते भी हैं.’’ ते ऐकून मी सुन्न झालो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth makrand kapre article

टॅग्स