दंतकथेचं दुःख

मिलिंद वा. गाडगीळ
सोमवार, 12 जून 2017

‘दाताड वेंगाडून’ कुणी काही विचारलं तरी निमूट ऐकावं लागतं. त्यावर नकळत आपण हसलोच, तर ‘दात काय काढतोस?’ अशी पृच्छा होते. वाटतं, त्याचे ‘दात त्याच्याच घशात’ घालावेत. 

‘दाताड वेंगाडून’ कुणी काही विचारलं तरी निमूट ऐकावं लागतं. त्यावर नकळत आपण हसलोच, तर ‘दात काय काढतोस?’ अशी पृच्छा होते. वाटतं, त्याचे ‘दात त्याच्याच घशात’ घालावेत. 

कुणीतरी हसतं आणि कुणीतरी विचारतं ‘दात काय काढतोस?’ का वापरतात हा शब्दप्रयोग, याचा विचार करताना लक्षात आली दंतकथा. खरं तर दातांचं दुखणं बऱ्याच वेळा सुरू होतं ते दाढेपासून. दाढदुखी म्हणजे मस्तकात जाणारी वेदना आणि त्यामुळे येणारी विरक्ती. ‘काहीही नको वाटणं,’ हे या दुखण्याचं मुख्य लक्षण आहे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अचानक दाढदुखी सुरू होते आणि मग ‘कळा ह्या लागल्या जीवा’ हे गाणं सारखं आठवायला लागतं. अशावेळी कुठली तरी वेदनाशामक गोळी आणि लवंगेच्या तेलाचा बोळा हे ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेल्या खेळाडूसारखे वेळ काढण्यापुरते उपयोगी पडतात. त्यानंतर काही वेळानं आपण दंतवैद्याच्या भल्या मोठ्या खुर्चीत विराजमान होतो. ही एकच खुर्ची अशी आहे, की जिचा मोह कुणालाच होत नाही. आता डॉक्‍टर ‘आँ करा’ म्हणताच आपण तो करतो आणि थोड्या वेळातच त्याचं कौशल्य पाहून तोंडात बोट घालायला प्रवृत्त होतो. (अर्थात आपल्याच).

‘काय दात आहेत का सिग्नल? लाल, हिरवे, पिवळे!’ असं डॉक्‍टर कोणाला तरी म्हणतात आणि त्याही अवस्थेत आपल्याला हसू येतं. पान, तंबाखू, मावा, गुटका, सिगारेट, सुपारी आणि षडरिपूंना चावण्यात काहींचे दात खूपच ‘रंगून’ गेलेले असतात. त्यामुळे दात तपासल्यावर दंतवैद्य तीन पर्यायांपैकी एक पर्याय हमखास सुचवतात. दाढ काढणे, दाढ भरणे (चांदी कोणाची?) किंवा रुट कॅनॉल करणे. दातांचं दुखणं कोणत्या अवस्थेला पोचलं आहे, त्यावर उपचार अवलंबून असतात. मी दाढेत चांदी भरायला चाललो आहे, असं सांगितल्यावर माझ्या एका मित्रानं ‘आत्ताच सर्व दाढांत भरपूर चांदी भरून घे, भाव उतरले आहेत. पुढे भाव वाढल्यावर थोडी काढून विकलीस तरी डॉक्‍टरची फी बाहेर पडेल,’ असं सुचवून मला ‘दातखीळ बसणे’ या शब्दाचा अनुभव दिला. मी काही कमी नाही. म्हणालो, ‘तू आत्ताच सोन्याची कवळी करून घे, सध्या सोन्याचा भाव खूप कमी आहे. पुढे भाव वाढल्यावर एक-एक दात पाडून विकलास तरी चांगली कमाई होईल.’ त्याची ‘बोलती बंद’.

एव्हाना दंतवैद्याच्या हातातलं सुईएवढं गिरमिट सुरू होतं. वेदना देणाऱ्या दाढेचा पोखरून पोखरून पोकळ शंख करून ठेवतात. मग त्यात सिमेंट- चांदी (हल्ली सिरॅमिक) असा दमदार माल भरून दुखऱ्या दाढेला चावा घेण्यासाठी पुन्हा सशक्त बनवलं जातं. हे निदान बरं, एवढं ते रुट कॅनॉल त्रासदायक असतं. एकतर पाच-सहा वेळा जावं लागतं. दरवेळी बोअर मारल्यासारखं सुईनं खणत जातात. शेवटी मुळातल्या नसा ‘डेड’ करून नव्यानं पायाभरणी करत कोनशिला बसवावी तशी कॅप बसवतात. या उपचाराची फी ऐकल्यावर नेमकी कुठून कळ येते तेच कळत नाही. 

दाढदुखीच्या काळात चेहरा प्रेमभंग झाल्यासारखा दिसायला लागतो. दाढ काढूनच टाकावी लागणार हे नक्की झालं की, एक महत्त्वाचा मोहरा गळणार या कल्पनेनं चेहराही उतरतो. आता वेदनेच्या जागी बधिरता येते. साहजिकच जड आणि दगड भावना दुखऱ्या भागावर स्वार होतात. डॉक्‍टर हातात पकड घेऊन दाढेला उलट्या-सुलट्या दिशेला फिरवतात आणि शक्तिप्रदर्शन करत दाढ उपटतात. आता समोरच्या ट्रेमध्ये दाढ ऊर्फ क्राऊन आणि दाढेच्या जागी खड्ड्यात कापसाचा बोळा विराजमान होतात. एकदा, दाढ काढल्यावर ‘बांधून देऊ का बरोबर,’ असं एका डॉक्‍टरनं विचारल्यावर ‘तो काय ताईत म्हणून गळ्यात बांधू का?’ असा प्रतिप्रश्‍न करणार होतो, पण डॉक्‍टरांच्या हातात अजूनही पकड होती, त्यामुळे उत्तर ओठातच राहिलं.

पूर्वी खरं तर साधारण मध्यम वय झालं की, दंतवैद्याकडे माणसं जायची. पण आता लहान वयातसुद्धा दात किंचितसे पुढे आहेत किंवा काही वेडेवाकडे आले आहेत या कारणास्तव तारेचं कुंपण दातांवर घालण्याकरिता ऑर्थोकडे जाणं वाढलं आहे. असो. वयोमानाप्रमाणे दातांची विविध दुखणी, व्याधी मागे लागतात. अनेक जण एक-एक दात गमावत केव्हा कवळीच्या उंबरठ्यावर येऊन पोचतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. बोलताना अचानक काही शब्द हवा भरल्यासारखे फुसफुस करत उच्चारले जातात. त्यामुळे आता ‘दाखवायचे’ दात निराळे आहेत, याची मनोमन खात्री पटते.

तेव्हा तोंड अथवा बत्तीशी हे शरीराचं प्रवेशद्वार आहे. देहाचा हा किल्ला भक्कम राहावा असं वाटत असेल तर ह्या प्रवेशद्वाराची डागडुजी वेळच्या वेळी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटी किल्ल्याच्या आतमध्ये कितीही पडझड झाली असली, तरी प्रवेशद्वार व्यवस्थित ठेवायचं ही आपली परंपरा आहे, ती विसरून कशी चालेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth Milind Gadgil