देवमाणसे भेटली

देवमाणसे भेटली

संकटे सांगून येत नाहीत; पण संकटांवेळी माणसे धावून येतात. आपल्या प्राणावर बेतलेले असताना देवासारखी येऊन आपली काळजी घेतात. ती माणसे साधीसुधी नसतात, देवमाणसे असतात ती.

पहाटे पाचची वेळ. स्वयंपाकघरातल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. माझे वडील, दोन भाऊ, पुतण्या व मी असे पाच जण गंभीर भाजलो होतो. सदाशिव पेठेत ज्ञानप्रबोधिनीजवळ आमच्या आत-बाहेर अशा दोन खोल्या होत्या. वाडा असल्यामुळे स्वयंपाकघराला खिडकी नव्हती. त्या रात्री उंदराने गॅसची नळी कुरतडली, त्यामुळे रात्रभर गॅसगळती होऊन पूर्ण घरामध्ये पसरला होता. थंडीचे दिवस असल्यामुळे दारे-खिडक्‍या बंद होत्या. नेहमीप्रमाणे माझे वडील सकाळी सवयीप्रमाणे पहाटे पाचला उठून पाणी गरम करण्यासाठी गॅसकडे गेले. त्यांनी काडी ओढली अन्‌... मोठा आवाज झाला. तो स्फोट एवढा भयानक होता, की आमच्या घराचा मुख्य दरवाजा कडीसकट उखडून बाहेर पडला. वरचे छतसुद्धा उखडले होते. आवाज ऐकून वाड्यामधील सर्व जण धावत आले. आमच्या घरामधील सर्व सामानाने पेट घेतला होता. सर्व कपडे जळत होते. माझे वडील पूर्णपणे भाजले होते. ओळखूच येत नव्हते. माझा एक भाऊसुद्धा खूप भाजला होता. माझ्या शरीराची आगआग होत होती. दुसरा भाऊ खाटेखाली झोपल्यामुळे असेल; पण आमच्यापेक्षा कमी भाजला होता. 

वाड्यामधील लोकांनी आम्हाला बाहेर काढले. आग विझवली. स्फोट खूप मोठा होता, त्यामुळे ही बातमी सगळीकडे पसरली. माझे मित्र, अखिल विश्‍व मित्रमंडळ, सदाशिव पेठ मंडळाचे कार्यकर्ते धावून आले. प्रमोद मोहिते यांनी दूरध्वनी करून इतरांना बोलावून घेतले. एकीकडे आम्हाला ससून रुग्णालयात हलवण्यात आले, तर माझे मित्र नितीन दमामे आणि नितीन चौधरी स्वतःची गाडी घेऊन कोकणात गेले आणि माझ्या आईला व बहिणीला घेऊन आले.

ससून रुग्णालयात डॉक्‍टरांनी वेगाने उपचार सुरू केले. माझे वडील पूर्ण भाजले होते. ते वाचणार नाहीत, असेच सांगितले होते. आम्हा दोन्ही भावांचे हात, पाय, चेहरा भाजले होते. सुजले होते. आम्हाला काहीही कळत नव्हते. घरातले पाच जण भाजल्याने शुद्धीच्या पलीकडे. माझ्या सर्व मित्रांना काय करावे सुचत नव्हते. सगळेच मित्र विशी-बाविशीतील. दोन दिवस सर्व मित्रांनी ससूनमध्ये जागून काढले. मित्रांनी त्या वेळचे नगरसेवक शांतीलाल सुरतवाला यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. सुरतवाला यांनी ताबडतोब सारसबागेजवळील भावे हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्वांना हलवले. डॉ. भावे यांनाही माझ्या वडिलांची व भावाची जगण्याची खात्री वाटत नव्हती. डॉक्‍टर जणू यमदूताशी लढत होते. काही औषधे आणि इंजेक्‍शन पुण्यामध्ये मिळत नव्हती. त्या वेळी अमूल व्होरा या मित्राने मुंबईला जाऊन आमच्यासाठी खूप महागडी इंजेक्‍शन आणि औषधे आणली. त्यासाठी प्रकाश दुगड यांनीसुद्धा मदत केली. 

मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सदाशिव पेठेतील अनेक जण खूप मोलाची मदत करत होते. आम्हाला काहीच कळत नव्हते. अंगाची इतकी आग होत होती, की जगणे असह्य होत होते. भाऊ व वडील तर श्‍वासाच्या अंतरावर जगण्यामरण्याच्या सीमेवर होते. हॉस्पिटलचा खर्च खूप होता. आम्ही सर्व जण तीन महिने रुग्णालयात होतो. रोजचा खर्च वाढतच होता. दिवसाला पंधरा ते वीस महागडी इंजेक्‍शन आणि सलाइन चालू असायची. सगळे मित्र, मंडळाचे कार्यकर्ते पैसे उभे करत होते; पण या सगळ्यांच्या धडपडीला यश येत होते. हळूहळू आमच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा होत होती. माझ्या वडिलांना, भावाला आणि सर्व कुटुंबालाच नवीन जन्म मिळाला होता. मित्रांनी खूप खर्च केला, तरी शेवटी रुग्णालयाचे बिल भरण्याकरिता पैसे कमी पडत होते. माझे मित्र नितीन दमामे यांनी एक गाण्याचा कार्यक्रम ‘बालगंधर्व’मध्ये आयोजित केला. प्रमोद मोहिते, दिलीप मोहिते, किरण चौधरी, नितीन चौधरी, निशिकांत पाटणे, सोनाली कोद्रे, अजय पाथरकर आणि सर्व मित्रमंडळींनी त्याकरिता सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महापालिकेकडून तारीख व वेळ मिळवण्यासाठी दिलीप मोहिते व सुरतवाला यांनी मदत केली. हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही खूप मदत केली. 

आम्ही सर्व जण बरे झालो म्हणून आम्हाला कोकणामध्ये एका गाडीने घरी पाठविले. त्यानंतर एका महिन्यामध्ये घराची पूर्ण दुरुस्ती करून पुन्हा आम्हाला घरी घेऊन आले. सर्व घर स्वच्छ करून सर्व सामान भरून आम्ही घरात आलो. हॉस्पिटलमध्ये तीन महिने असताना द्रौपदी मारुती चौरे यांनी सकाळ-संध्याकाळ खाऊ-पिऊ घातले. या माउलीचे प्रेम, माझ्या मित्रांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच आम्ही तरलो. या देवमाणसांचे आभार तरी कसे मानायचे? त्यांचे प्रेम अनुभवत राहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com