एव्हरेस्ट - जवळ नि दूर

एव्हरेस्ट - जवळ नि दूर

एव्हरेस्ट. जगातलं उंच शिखर. सर्वदूर बर्फ पसरलेलं. वाट अवघड. पावलागणिक परीक्षा पाहणारी चढण. शिखराच्या जवळ जाऊ तसे उसळी घेत अंगावर येणारा वारा आव्हान देतो. या शिखराच्या अगदी जवळ जाऊन परतणेही खूप आहे. 

त्याला खुणावत होते माऊंट एव्हरेस्ट. त्यासाठी त्याने दोन वर्षे अखंड मेहनत घेतली. त्याने एव्हरेस्टवर चढाई केलीही. अगदी हाताच्या अंतरावर पोचला, पण.. तेवढे अंतर उरलेच. तिथून तो माघारी परतला, पण पुन्हा जाण्याचा निश्‍चय करून. 

ही कहाणी आहे सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनच्या भगवान चवले याची. त्याच्याच शब्दांत ही कहाणी सांगतो-

साऊथ कोल (कॅम्प ४) वरून रात्री सात वाजता समिटसाठी निघणार होतो; पण वाऱ्याचा वेग वाढत चालला होता. वारा पन्नास किलोमीटर वेगाने वाहत होता. रात्री दहाच्या आसपास वाऱ्याचा वेग चाळीस किलोमीटरपर्यंत कमी झाला. वीस-पंचवीस गिर्यारोहक निघाले. त्यांच्यामागे मीही निघालो. उशीर झाला होता; पण माझा चालण्याचा वेग चांगला असल्यामुळे मी वेगाने पुढे सरकत होतो. साडेतीन तासांत मी बाल्कनी पार केली. आदल्या दिवशीच तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता, त्यातील एका परदेशी गिर्यारोहकाचा मृतदेह दिसला. पुढे गेल्यावर आणखी एक. गेल्या वर्षी गौतम घोषने येथे चिरविश्रांती घेतली. त्याचा देह निसर्गाने जपून ठेवला होता. आठ ते दहा गिर्यारोहकांना मागे टाकून मी पुढे गेलो होतो. बाल्कनीच्या पुढे एक रीज चालू होते. माझे मित्र रवी कुमार २० मे रोजी समिट करून परतताना याच रीजवरून हरवले होते. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. त्यांचाही मृतदेह खाली नेता येणे  शक्‍य झालेले नाही. मित्रांचे असे मृतदेह पाहताना मनावरचा ताण वाढतो. 

आता खरी दमछाक सुरू झाली. साऊथ समिटच्या खालच्या रॉक पॅचजवळ पोचलो होतो. तिथे पोचायला गर्दीमुळे एक तास लागला. आता वाऱ्याने रौद्र रूप धारण केले होते. तरीही पहाटे साडेपाच वाजता साऊथ समिटवर (२८,६८० फूट) पोचलो. कॅम्प ४ वरून येथे पोचायला मला पावणेसात तास लागले. आता समिट फक्त ३५० फूट दूर. एक तास अजून चालायचे होते. समिट नजरेसमोर दिसत होते. त्याच वेळी वाऱ्याचा वेग वाढला होता. उभेही राहता येत नव्हते. साऊथ समिट ते रीज आम्हाला बसत बसत सरकावे लागले. वाऱ्याने आता हाहाकार मांडला. साऊथ समिट पार करून आम्ही खाली आडोशाला थांबलो. वाऱ्याचा वेग ताशी सव्वाशे किलोमीटर एवढा होता. वारे उसळी घेत रीजवर येत होते. माझ्यापुढचे गिर्यारोहक बसून वादळ शमण्याची वाट पाहत होते. तिथून वॉकीटॉकीवरून झिरपे मामांशी बोललो. त्यांनी थोडा वेळ वाट पाहून परतण्यास सांगितले. आम्ही सगळे तासभर बसून होतो. वादळाचा वेग आणखीच वाढू लागला. तेवढ्यात तिबेटच्या बाजूने जोरदार हिमस्खलन होताना दिसले. आता धीर धरवेना. आम्ही सगळे मागे फिरलो. आता चढाई संपली आणि लढाई सुरू झाली ती जिवंत राहण्याची. शंभर मीटरवर असलेले शिखर सोडताना डोळ्यांत पाणी आले. गिर्यारोहकांना सांगितले जाते, ‘To reach on summit is optional, but coming down safety is mandatory.` आता वाऱ्याबरोबर हिमकण चेहऱ्यावर वेगाने आदळत होते. श्‍वास घेण्यास त्रास होत होता. बाल्कनीमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर बदलायला खूप त्रास झाला. त्यात माझ्या शेर्पाचा ऑक्‍सी रेग्युलरला गळती सुरू झाली. तो तसाच उतरू लागला. थोड्या अंतरावर एक अमेरिकन गिर्यारोहक ऑक्‍सिजनच्या कमरतेमुळे कोसळला. आता आमची जगण्याची धडपड वाढली. माझ्या फुर्बा शेर्पाचा ऑक्‍सिजन संपला. वाटले, शेर्पाचा रेस्क्‍यू करावा लागतोय की काय; पण दुसऱ्या तेन्जिंग शेर्पाने त्याच्याकडचा ऑक्‍सी लगेच बदलला. कसेबसे कॅम्प ४ वर पोचलो, तर तेथे वाऱ्याने थैमान मांडलेले. तीन तासांत आम्ही साऊथ समिटवरून साऊथ कोलवर पोचलो. तेथेही वारा होताच. पन्नासपैकी जेमतेम बारा-तेरा तंबू शिल्लक होते. गर्दी करून राहिलो. सकाळी साडेसहाला कॅम्प चार सोडला आणि अकरा वाजता कॅम्प दोनवर पोचलो आणि सुटकेचा श्‍वास सोडला. कालच्या वादळी वाऱ्यात माझ्या दोन्ही पायांचे अंगठे आणि बाजूच्या तीन बोटांना चीलब्लेन झाले होते. 

चोमोलुंगमा (एव्हरेस्टचे नेपाळी नाव) आता मागे परतलोय; पण लवकरच पुन्हा भेटीला येईल. थकणार नाही, हरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com