ग्रंथ पोचवू 'नेटा'ने 

देवयानी मांडवगणे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

धार्मिक ग्रंथांसाठीची ख्याती असलेले दुकान आता शंभरीनंतर नवी वाट "नेटा'ने चालते आहे. 

एकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, "महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या मोठ्या ग्रंथराजावरून हात फिरवताना आजोबांचे डोळे पाणावले. म्हणाले, ""गेली सात वर्षे याचसाठी पैसे जमवत होतो.'' लक्षावधी शब्दांचा संग्रह असलेला तो ग्रंथराज समोर आणि तेथे उपस्थित सारे निःशब्द झालेले. ते आजोबाच बोलू लागले, "तुमच्याकडे हा ग्रंथ नक्की मिळणारच याची खात्री होती.' ग्राहकांचा विश्वास मिळवणाऱ्या अप्पा बळवंत चौकातील "नेर्लेकर बुक डेपो'ची धार्मिक ग्रंथांसाठी ख्याती 1917 पासून म्हणजे शंभर वर्षांपासून आहे. 

धार्मिक ग्रंथविक्रीचे ठिकाण असले तरी येथे जीवनाबद्दलची, व्यवसायातील उदासीनता, कंटाळा नाहीच; येथे सकारात्मकता आणि ग्राहकांचे समाधान होईपर्यंत सेवा पुरवण्यातील उत्साह ओसंडून वाहत आहे. येथे पूर्वी पंचांगे भाड्याने मिळत असत हे ऐकले की गंमत वाटेल. उत्तर भारतातील एका ग्राहकास विवाह मुहूर्तासाठी हवे असलेले बनारस पंचांग इथे मिळाल्यावर त्याला कोण आनंद झाला! श्रावणातील पोथ्या चरबीऐवजी शुद्ध तुपाचा वापर केलेल्या शाईने छापलेल्या आहेत, अशी एकेकाळी जाहिरात केली जात असे. येथील सामाजिक, धार्मिक इतिहास कथन करणारी ही काही बोलकी उदाहरणे आहेत. 

अरुण नेर्लेकर यांच्यानंतर चौथी पिढी आता नव्या काळात, नव्या जोषात, नव्या पद्धतीने ग्रंथविक्रीचा वसा पुढे नेत आहे. आता केवळ पुण्यातच नव्हे, तर जगभरही ग्रंथविक्री करणे इंटरनेटच्या साह्याने शक्‍य झाले आहे. ग्रंथ पोचवू "नेटा'ने म्हणत इंटरनेटच्या माध्यमातून ग्रंथ पोचविण्याचा पर्याय नव्या पिढीतील सारंग नेर्लेकर यांनी स्वीकारला आहे.

प्राचीन साहित्य, वैदिक वाङ्‌मयापासून ते ललित साहित्यापर्यंत, मराठीसह इतर भाषांतील, सर्व विषयांवरील दुर्मीळ ग्रंथांची इंटरनेटच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याची एक नवी वाट शंभर वर्षांच्या या "डेपो'ने चोखाळली आहे. हे "ई-ग्रंथालय' (www.egranthalay.com ) तरुण पिढीला आपलेसे वाटेल, असा विश्‍वास वाटतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth Article on Granth