ऑस्ट्रेलियातील समाजसेवा

आनंद चंद्रसेन राजेशिर्के
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

परदेशात पाहुणा म्हणून गेलो. काम करताना वेळही मजेत गेला. त्याहून अधिक म्हणजे एका म्हाताऱ्या जोडप्याला आनंद देऊ शकलो, समाजकार्य करू शकलो.

परदेशात पाहुणा म्हणून गेलो. काम करताना वेळही मजेत गेला. त्याहून अधिक म्हणजे एका म्हाताऱ्या जोडप्याला आनंद देऊ शकलो, समाजकार्य करू शकलो.

मेलबर्नमधील माझ्या मुलीकडे गेलो होतो. तेथे आमच्या ‘सर्वास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य आहेत. त्यांच्यापैकी चौदा एकर इस्टेटीचे मालक असलेले हानसोन जॉन व बेब या वयोवृद्ध जोडप्याकडे दोन दिवस मुक्काम होता. मेलबर्नपासून तीस किलोमीटर दूर यारा नदीच्या काठी असलेल्या वोरणदिएट या छोट्या शांत गावी ते राहतात. सोन्याचा साठा सापडल्याने पूर्वी भरभराटीस आलेले, पण आता बाजूला पडलेले हे गाव. हानसोनच्या उजव्या खुब्याची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली, डाव्याचीही ठरलेली. बायकोही सतत आजारी. दोघांनीही ऐंशी ओलांडलेली. पण उत्साही. सकाळी नाश्ता करताना हानसोन म्हणाला, ‘‘आम्ही दोघेही आजारी, वृद्ध आहोत. तुझी मदत झाली तरच मला एक सामाजिक काम करता येईल, तुला ते शक्यही आहे. पफ्फिंग नावाचे एक दुर्मिळ झाड आहे. त्याच्या करड्या रंगाच्या बारीक फुले असलेल्या फांद्या नाताळच्या आधी आठवडे बाजारात दोन ते पाच डॉलर्सला विकल्या जातात. ज्याच्या बंगल्यात ही झाडे आहेत त्यांची फांद्या तोडून नेण्यासाठी परवानगी काढली आहे, माझ्या स्टेशनवॅगनमधून लहान-मोठ्या कात्र्या घेऊन तेथे जाऊन, त्या तोडून गावातल्या चर्चच्या आवारात पाण्याच्या टाकीत बुडवून ठेवू. बाजारात मी दुकान मांडून ते विकेन. करशील?’’

काहीही विचार न करता संधी तर घेतली, पण दिवसभर मोठी कात्री, कुऱ्हाडीने अडचणीच्या जागेतून या फांद्या तोडून गाडीने पाच-सहा खेपा करून चर्चमध्ये पाण्याच्या टाकीत नीट रचून ठेवताना माझा त्या थंडीतही अनेकवेळा घाम निघाला. पण ऐंशी वर्षांच्या हानसोनचा उत्साह नी त्याला खुरडत भरभर चालताना पाहून मलाही वेगळीच स्फूर्ती आली. नंतरच्या आठवड्यात आलेला त्याचा ई मेल पाहून मी स्वतःवरच खूश झालो. ‘तू पाहुणा म्हणून दूर देशातून आलास. मी तुला कामाला लावले. मलाच नंतर खूप वाईट वाटले. पण एक चांगली बातमी आहे, त्या फांद्या मी नंतरच्या आठवडे बाजारात पोलिस चौकीच्या आवारातच विकल्या. त्याचे तीन हजार डॉलर (अदमासे एक लाख ऐंशी हजार रुपये मिळाले). ते आधीच ठरल्याप्रमाणे समोरच्या चर्चला नेऊन दिले. तुझ्या मदतीमुळेच हे शक्य झाले. तू, तुझा देश व संस्कृती, मी या छोट्या गावात सर्वांकडे अभिमानाने जाहीररीत्या पसरवली.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by aanand rajeshirke