मला माणूस हवंय!

आराधना कुलकर्णी
बुधवार, 17 जुलै 2019

सर्व सेवासुविधा विकत घेता येतात; पण जवळच्या माणसाचा सहवास, प्रेम, स्पर्श बाजारात मिळत नाही.

सर्व सेवासुविधा विकत घेता येतात; पण जवळच्या माणसाचा सहवास, प्रेम, स्पर्श बाजारात मिळत नाही.

एका रुग्णालयातील डायलिसिस विभागात जाणे झाले. बरेच रुग्ण डायलिसिसचे. कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते. एकूण वातावरण शांत व गंभीर होते. मी ज्यांना भेटायला गेले, त्यांच्या बाजूच्या बेडवर एक वृद्ध बाई होत्या. माझे त्यांच्याकडे लक्ष गेले, तेव्हा त्या मला काहीतरी म्हणत आहेत असे वाटले. त्यांना मी खुणेने काय, असे विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. जवळ कोणी नव्हते. त्या मला पुन्हा काहीतरी म्हणाल्या. नीट ऐकू आले नाही म्हणून मी काकांच्या बेडला वळसा घालून त्यांच्या जवळ गेले. मला वाटले, त्यांना काही मदत हवी आहे. "काही हवंय का?," मी विचारले. त्या म्हणाल्या," मला माणूस हवंय'. मी चमकले. मला वाटले मी काहीतरी चुकीचे ऐकले. मी परत विचारलं "काय हवंय?' त्या पुन्हा म्हणाल्या "मला माणूस हवंय'. मी विचारले, "तुमच्याबरोबरचे कुठे आहेत?' त्यावर चेहऱ्यावर त्रासिक भाव व आवाजात कडवेपणा आणून त्या म्हणाल्या, "असेल बाहेर कुठेतरी, पण मला ती नको, मला माणूस हवंय'.

त्या वातावरणात त्यांचे ते वाक्‍य मला अगदीच अनपेक्षित होते. मी विचारले, "काही त्रास होतोय का?' तेवढ्यात परिचारिका आली. म्हणाली, ""आजी थोडाच वेळ राहिला आहे. शांत राहा बघू.'' मग माझ्याकडे वळून म्हणाली, ""यांच्याबरोबर ज्या आल्या आहेत त्या बाहेर बसल्या आहेत. या सारख्या त्यांना त्रास देतात म्हणून त्या बाहेर थांबल्या आहेत.'' मग तिच्या बोलवण्यावरून एक तरुण मुलगी आत त्यांच्याजवळ आली; पण त्यांनी मान फिरवली. नंतर मला समजले की त्या बाई एकट्याच असून, ती तरुण मुलगी त्यांची केअरटेकर आहे. बाईंची मुलगी अमेरिकेत असते. ती उपचारांचा, देखभाल करणारीचा सर्व खर्च पाठवते. बाईंना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करावे लागते. त्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून येणे-जाणे करावे लागते. त्यांना परिचारिका, केअरटेकर असे कोणीच नको होते. कोणीतरी जवळचे, रक्ताचे, खास असे माणूस हवे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by aaradhana kulkarni