समॄद्धीचं दुखणं...

ऍड. मंजिरी घाटपांडे
Wednesday, 4 December 2019

मध्यमवर्गीयांचे पूर्वीचे ठेचकाळत संसार हाकणे आता उरले नाही. बरे दिवस आहेत. त्यामुळेच वेळ व पैसा कसा खर्च करावा याचा प्रश्न पडू लागला आहे. त्यातूनच समृद्धीचे दुखणे मागे लागले आहे.

मध्यमवर्गीयांचे पूर्वीचे ठेचकाळत संसार हाकणे आता उरले नाही. बरे दिवस आहेत. त्यामुळेच वेळ व पैसा कसा खर्च करावा याचा प्रश्न पडू लागला आहे. त्यातूनच समृद्धीचे दुखणे मागे लागले आहे.

कायद्याचा अभ्यास करताना शिकलेले आठवते, ‘समाजात जास्तीत जास्त लोकांचे भले करण्याची हमी’ देण्यासाठी कायदा असतो. नुकताच ॲस्कॉमचा अहवाल वाचनात आला. म्हणे, भारतातील एकावन्न टक्के संपत्ती केवळ दोन टक्के लोकांकडे एकवटलेली आहे. मग काय झाले त्या ‘जास्तीत जास्त लोकांचे भले करण्याची हमी’चे? चांगल्याची आस प्रत्येकालाच असते. पण, आस आणि हव्यास यात फरकच दिसेनासा झाला आहे. आता माझेच कपड्यांचे कपाट उघडायचे निमित्त झाले. जाणवले, किती हे कपडे? कपडे हे फक्त उदाहरण आहे. सगळ्याच गोष्टींचे आता असे होऊ लागले. बंधुरायांची प्रतिक्रिया मिळाली, ‘‘जयललितांच्या सातशे सँडल्सला कशाला हसायचे?’’ क्षणभर का होईना पण वाटले खरे काही तरी चुकल्यासारखे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत फारच बदल झालाय खरा. घरात माणसे दोन आणि गाड्या तीन-चार, बेडरूम्स दोन-तीन, टॉयलेट दोन-तीन, नोकर तीन तरी, भांडी असंख्य आणि पाहुणे मात्र नगण्य! अचानक कोणाकडे जाऊन टपकायची तर पद्धतच बंद झाली. आधी फोन करा, मग तयार व्हा, मग सोसायटी गेटवर एन्ट्री करा, हजार भानगडी... आणि एवढे करून भेटल्यावर बोला काय? सर्व तर एकमेकांना व्हॉट्सॲपमुळे माहितीच असते. त्यामुळे आता भेटी कारणापुरत्या... तेही सर्व मालिकांच्या दिग्दर्शकांनी ठरविलेल्या ड्रेपरीसह व डोक्यात फिट केलेल्या संवादासह.

खरे तर वाढत्या वयाबरोबर हव्यास कमी व्हायला काय हरकत आहे? चांगल्याची आस विवेकबुद्धी शाबूत ठेवते. पण, हव्यास मात्र तारतम्य हरवायला भाग पाडतो आणि मग आयुष्याचे गणित चुकायला लागते. मी असे काही बोलायला लागले की माझा नवरा म्हणतो, स्मशान वैराग्य आले वाटते! पण हे स्मशान वैराग्य नव्हे. मला खरेच वाटतेय, की हे खरेद्याबिरेद्या सगळे फोल आहे. नुसते रिकामा वेळ भरून काढणे आणि जम बसल्यावर सहज येऊ लागलेला पैसा संपवण्याचा वृथा प्रयत्न आहे. माणसांनी वेगळा विचार करूच नये यासाठी अतोनात ‘मार्केट फोर्सेस’ काम करत आहेत आणि आपण सगळेच मध्यमवर्गीय त्यात प्रवाहपतीत होत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by advocate manjiri ghatpande