...आणि प्राजक्त फुलला

अंजली वाघ
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

गावच्या वाड्याशी गोंदलेल्या खुणा पावसाने मिटवल्या खऱ्या; पण पारिजातकाने पुन्हा एकदा मनात त्याचा गंध रुजवला.

गावच्या वाड्याशी गोंदलेल्या खुणा पावसाने मिटवल्या खऱ्या; पण पारिजातकाने पुन्हा एकदा मनात त्याचा गंध रुजवला.

गावाकडे आजी एकटीच राहायची. भला मोठा चौसोपी वाडा होता आणि त्यात आजी एकटी. कधीकाळी त्या वाड्यात खूप गजबज होती. आता ती गजबज उरली नाही, तरी आजीच्या असण्याने त्या वाड्याला जिवंतपणा होता. वाड्याला अंगण, परसदार, ओसरी, छानसे तुळशी वृंदावन आणि परसदरात एका कोपऱ्यात प्राजक्त. आमची मे महिन्याची सुट्टी इथेच मौजमजा करण्यात जायची. कालांतराने आजी गेली. वाड्याला कुलूप लावण्याशिवाय पर्याय नव्हता. एक पर्व संपले होते. शिक्षणाच्या निमित्ताने आणि पोटापाण्याच्या निमित्ताने सर्व जण दूर गावी मग्न होते. बाबा मात्र अधूनमधून गावाकडे जायचे. नंतर ते ही थकले. त्यांचे गावाकडे जाणे थांबले. आम्हीही जमेल तेव्हा गावाकडे जायचो. वाड्याला तेवढीच जाग असायची.

एक दिवस गावाकडून दूरध्वनी आला, की आमचा वाडा पावसाने जमीनदोस्त झाला. ते ऐकून सगळ्यांना फार वाईट वाटले. कोणाचेच मन कामात लागेनात. आम्ही गाडी घेऊन गावाकडे गेलो. कोसळलेला वाडा पाहून आम्हाला रडूच आले. सगळा वाडा पडला होता, पण वाड्याचा दरवाजा गंजलेल्या कुलपासकट उभा होता. मातीच्या ढिगाऱ्यावरून कसेबसे आत गेलो. सर्व ओसाड आणि भयाण दिसत होते. अंगणातला प्राजक्त मात्र बहरून आलेला दिसला. एवढ्या मोठ्या दुःखात खंबीरपणे धीरगंभीरसा दरवळत उभा होता. जणू आमच्याकडे बघून मुक्‍या भावनांनी खुणवत होता, ‘अरे, मी एकटा असून उभा आहे. अगदी एकाकी. मग तुम्ही का असे हताश होता?’ प्राजक्ताने आम्हाला पुन्हा एकदा जोमाने उभे राहण्याचे बळ दिले. आम्ही ठरवले वाडा पुन्हा बांधायचा. जाताना रिते झालेले मन परत येताना पारिजातकाने फुलवले होते. आता आत पुन्हा एकदा प्राजक्त फुलला होता!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by anjali wagh