फिरत्या चाकावरती...

अनुपमा मुजुमदार
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

संकटात हतबल होणारे असतात काही; पण काही जण दुःखाचे देव्हारे न माजवता संकटावर मात करतात. इतरांना जगण्याचं बळ देतात.

संकटात हतबल होणारे असतात काही; पण काही जण दुःखाचे देव्हारे न माजवता संकटावर मात करतात. इतरांना जगण्याचं बळ देतात.

ही गोष्ट आहे इचलकरंजीचे डॉ. अभय कुडचे यांची. पुण्याहून आपल्या गावी परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डॉक्‍टरांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मणक्‍याला इजा झाली. कमरेखालच्या शरीराची संवेदनाच गेली. अचानक आलेल्या संकटामुळे स्वतः डॉक्‍टर असले, तरी ते उदास झाले, गोंधळून गेले. मनात विचाराचे थैमान. भविष्यात काय? घरच्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती. पत्नी, दोन्ही मुली पहिल्यांदा खचून गेल्या. पण, एका क्षणी फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे हे सारे कुटुंब संकटाला धैर्याने सामोरे गेले. काही महिन्यांच्या उपचारानंतर डॉक्‍टरांचे फिरत्या चाकावरचे आयुष्य सुरू झाले. आपले दैनंदिन व्यवहार ते खुर्चीच्या साहाय्यानेच करू लागले.

आपल्या शिक्षणाचा उपयोग गावकऱ्यांना व्हावा, हा ध्यास घेऊन डॉक्टरांनी इचलकरंजीमध्ये रुग्णालय उभारले आहे. लोकांचा उदंड विश्‍वास. डॉक्टरांवरचे हे संकटच असे की, बसल्या जागेवर खिळवून ठेवणारे. अशावेळी भविष्यात काय करायचे, हे काहींना समजत नाही. पण, डॉक्‍टरांच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर पत्नी, मुली व रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांचे रोजचे काम सुरू झाले. त्यांचा दिवस पहाटे सुरू होतो. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम घेत शरीराची शक्‍य तेवढी हालचाल करतात. काही दिवसांतच डॉक्‍टर चाकाच्या खुर्चीतून रुग्णालयात येऊ लागले. परिचारिकांच्या मदतीने रुग्णांना तपासू लागले. डॉक्‍टर रुग्णाशी बराच वेळ संवाद साधत त्यांच्याकडून त्यांना होणाऱ्या वेदनांची व लक्षणांची माहिती घेत. डॉक्‍टर आपल्याशी संवाद साधतात, आपल्या समस्या ऐकून घेतात. यामुळे रुग्णांनाही समाधान मिळे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य रुग्णांना जगण्याचे बळ देते. त्यांच्या वागण्यातील सहज साधेपणा रुग्णांना कायमचा लक्षात राहतो. कमरेला आलेली बधीरता डॉक्टरांनी मनाला येऊ दिली नाही. उलट रुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत अखंड रुग्णसेवा ते करतात. रुग्णालयातील त्यांचा खुर्चीवरील वावर सर्वांना अचंबित करून सोडतो. रुग्णांच्याही लक्षात आले, जे लढायचे जाणतात, त्यांचेच मन हिरवेगार आणि प्रसन्न असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by anupama mujumdar