आत्मबळाला अभिवादन

अपर्णा महाजन
शनिवार, 7 मार्च 2020

महिला दिन हे केवळ एकदिवसीय ‘सेलिब्रेशन’ नाही, तर त्यांच्या आत्मबळाला उजळणारे अभिवादन आहे.

महिला दिन हे केवळ एकदिवसीय ‘सेलिब्रेशन’ नाही, तर त्यांच्या आत्मबळाला उजळणारे अभिवादन आहे.

दिवस साजरे करणे, हे एक कर्मकांड झाले आहे. झगझगीत बाह्यरूप आणि वैचारिक खुजेपणाने दाखविलेला आक्रमक द्वेष. माणसांच्या जगात ‘सेलिब्रेशन’ हाच परवलीचा शब्द. पार्टी, खेळ-शर्यती आणि त्याला बक्षिसे, स्त्रियांनी स्वतःची आणि इतरांनी स्त्रियांची केलेली चेष्टा आणि मोबाईलवर वाहणारे संदेश, म्हणजे असतो का महिला दिन? महिलांना ‘दीन’ व्हायला लावणाऱ्या गोष्टी केल्या जातातच की वर्षभर. युगानुयुगे असणारी पुरुषी सत्ता आणि स्त्रियांची गुलामी, स्त्रीवर हुकूमत या वृत्तीला तोंड फोडले गेले अठराव्या शतकाच्या आधी. औद्योगिक क्रांती घडली आणि स्त्रियांवर परंपरागत लादलेल्या चूल आणि मूल या सूत्राला हादरा बसला. पुरुषांची संख्या कमी पडली म्हणून स्त्रियांना घराबाहेर काम करण्याची संधी मिळाली. स्वतःचे मत प्रदर्शित न करण्याची सवय असलेल्या स्त्रियांना मिळालेली ही सुवर्णसंधी होती. प्रतिकूल परिस्थितीत, जास्त वेळ, पैसे कमी असे असून, मिळालेल्या नव्या संधीने स्त्रियांच्या मनात बाहेरच्या जगात काम करण्याचे धुमारे फुटले. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जगामध्येही आपण पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेऊ शकतो ही जाणीव झाली. पहिल्या महायुद्धाने पुरुषांना युद्धात सामील करून घेतल्यावर, आपल्याला मतदानाचा हक्क असावा, या बीजाने स्त्रीवादाचा आरंभ झाला. १९०८ मध्ये कपड्यांच्या कारखान्यातल्या अत्यंत हीन परिस्थितीविरुद्ध न्यूयार्कमधल्या स्त्री कामगारांनी आठ मार्चला आंदोलन केले, त्यांच्या आत्मबळाला अभिवादन म्हणून जागतिक पातळीवर हा महिला दिन म्हणून गणला जातो.

जगातल्या विचार करणाऱ्या स्त्रियांनी मांडलेल्या विचारांमुळे, लिखाणामुळे स्त्रीकडे गुलाम नव्हे तर माणूस म्हणून बघण्याला सुरुवात झाली. सिमोन दि बुवा, केट मिलेट, ताराबाई मोडक, सावित्रीबाई फुले आणि अशा अनेक जणी या समान सूत्राने बांधल्या गेल्या आहेत. आपली अस्मिता आपणच जपली पाहिजे, असा विचार मांडणाऱ्या स्त्रियांनी मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक अत्याचार करण्याच्या पुरुषी सत्तेविरुद्ध विचार मांडले. कोणत्याही भेदापलीकडे स्वतःच्या अस्मितेसाठी, मानवी हक्कांसाठी बंड केले. त्या नव्या वाटेवरून विचारपूर्वक पुढे चालण्यासाठी महिलांनी प्रवृत्त व्हावे, यासाठी शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by aparna mahajan