झटपट पासपोर्ट

दत्तात्रेय वारुणकर
Thursday, 9 January 2020

सरकारी कार्यालयांचा अनुभव फारसा समाधान देणारा नसतो, हा सर्वसाधारण समज आहे. पण, पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज याला अपवाद ठरत आहे.

सरकारी कार्यालयांचा अनुभव फारसा समाधान देणारा नसतो, हा सर्वसाधारण समज आहे. पण, पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज याला अपवाद ठरत आहे.

पारपत्र (पासपोर्ट) मिळवण्यासाठी इत्र तत्र फिरत्रचे अनुभव इतक्या जणांकडून ऐकले होते आणि मागच्या वेळी पासपोर्ट काढताना प्रत्यक्ष अनुभवलेही होते, की आपण त्या वाटेलाच पुन्हा जायला नको असे वाटायचे. पण, आता सगळेच बदलले आहे. पासपोर्ट मिळण्याच्या कामात सोपेपणा व गती आली आहे. मला नुकताच तसा अनुभव आला. काय झाले, की माझ्या पासपोर्टची मुदत संपत आल्याने मी ऑनलाइन अर्ज भरला. त्यासाठी साधारण पंधरा-वीस मिनिटे लागली. लगेच ऑनलाइन पैसेही भरले. चार दिवसांनंतरची भेटीची तारीख मिळाली. पासपोर्ट कार्यालयात निश्चित केलेल्या दिवशी सकाळी नऊ वाजता येण्यासाठी लगेच संदेश आला. पैसे मिळाल्याची पावतीही मेलने आली. थोड्या वेळाने आठवणीची मेल आली. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी कार्यालयात गेलो. तेथे अजिबातच अडचण आली नाही. सगळी कामे क्रमाने उरकून पाऊण तासात मी बाहेरही आलो. कामे फटाफट झाली. घरी येताना वाटेतच मला संदेश येऊ लागले. ‘तुमचा पासपोर्ट मंजूर झाला आहे’. ‘पासपोर्ट छापायला दिला आहे, छापून झाला की आपल्याला मेसेज येईल’. संध्याकाळी पासपोर्ट छापून तयार झाल्याचा संदेशही आला. दुपारीच पोलिस ठाण्यामधून संदेश आला व भेटून कागद सादर करण्याचे कळविण्यात आले. संध्याकाळी जाऊन भेटून कागदपत्रे सादर करून आलो. तिथेही काही वेळ लागला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे पासपोर्ट कार्यालयाचा संदेश आला, की ‘तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्टाने पाठविला आहे, तुम्ही ट्रॅक करू शकता’. या संदेशानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पासपोर्ट माझ्या घरी आले. म्हणजे ठरलेल्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी पासपोर्ट कार्यालयात गेलो आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पासपोर्ट माझ्या हातीही पडले. केवळ बावन्न तासांत पासपोर्ट माझ्या हाती मिळाले. सरकारी कार्यालयेही गतिमान होत आहेत, हे अनुभवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dattatrey warunkar