चाफ्याची फुलं

दीपाली गटलावार- बोरसे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

चाफ्याची फुले मंद धुंद सुगंधाने स्वागत करतात आणि आपल्या भोवतीचे वातावरणही प्रसन्न करतात. सारे खुजेपण मावळून टाकतात.

चाफ्याची फुले मंद धुंद सुगंधाने स्वागत करतात आणि आपल्या भोवतीचे वातावरणही प्रसन्न करतात. सारे खुजेपण मावळून टाकतात.

अकरा वाजले. लगबगीने शाळेत पोचले. टिचर्स रुमच्या दारात पाऊल ठेवताच मंद धुंद सुगंधाने माझे स्वागत केले. मी ओळखले, आमच्या धनवळेबाईंनी आजही सगळ्यांसाठी चाफ्याची फुले आणली आहेत. गेले दोन-अडीच महिने नित्यनेमाने ही चाफ्याची हसरी, सुवासिक फुले आम्ही साऱ्याजणी माळतो. चाफ्याच्या मोहक सुगंधावर सगळी शाळाच हिंदोळे घेते जणू. शालामातेची पवित्र वास्तू अधिकच खुलते. मुलीही म्हणतात, ‘‘बाई, तुमच्याकडे बघितले ना की, खूप प्रसन्न वाटते. तुम्ही ओळीतून फिरत असताना तुमच्या केसांतल्या चाफ्याच्या वासामुळे अगदी फ्रेश होतो आम्ही.’’

रोज इतकी फुले देणाऱ्या चाफ्याच्या झाडाचे छायाचित्र पाहण्याचा लाडीक हट्ट मोबाईलमधले छायाचित्र बघून पुरा झाला. किती साजिरे रूप! अंगाखांद्यावर असंख्य पिवळ्याधम्मक फुलांचा संभार. ते सुगंधी सोनेरी वैभव बघून मी हरखून गेले. लेकुरवाळ्या विठुरायाची मला आठवण झाली. प्रेमरुपी छाया आणि पुष्परुपी असीम माया या दोहोंचा वर्षाव करणाऱ्या चाफ्याच्या झाडातील देवत्वाची मला प्रचिती आली. रंग-रुप-रस-गंधाची मुक्तपणे उधळण करणाऱ्या निसर्गनारायणाला मी मनोमन वंदन केले.

‘अनंत हस्ते कमलावराने देता घेशील किती दो करांने’ ही उक्ती सार्थ ठरवणारी फुले! सदैव परमेश्‍वर चिंतनात लीन राहणाऱ्या निःसंग संन्याशाच्या भजन-कीर्तनातून ग्रामस्थांना नामस्मरणाचा सहज लाभ होतो. अगदी तशीच तरुवर मुग्धपणे डुलणारी, आत्मानंदात मग्न अशी चाफ्याची फुले सुगंधाची पखरण करत राहतात. देणाऱ्यासोबतच घेणाऱ्याची ओंजळही सुगंधित करतात. माणसातल्या खुजेपणाला खिजवतात. आप-पर भाव दूर सारून मैत्रीचा, एकोप्याचा संदेश देतात. परिपूर्णत्वाला साद घालण्याचे एवढे सामर्थ्य कुठून आणतात ही इवली इवली फुले! खरेच, चाफ्याच्या या सुंदर फुलांनी प्रेम, दातृत्व, सात्विकता अशा सर्वांगसुंदर भावना माझ्या मनात जागृत केल्या. मंगल सुगंधाची लयलूट करणारा वृक्ष आणि हे सुमनामृत आमच्यापर्यंत दररोज पोचविणाऱ्या धनवळे बाई दोघांचेही मनःपूर्वक आभार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by deepali gatlawar borse