माझी मॅरेथॉन

डॉ. अरुणा केळकर
गुरुवार, 5 मार्च 2020

ती स्पर्धा नव्हतीच. माणुसकीचा जल्लोष होता. स्पर्धा पूर्ण करण्याचाच आनंद तिथे अधिक होता.

ती स्पर्धा नव्हतीच. माणुसकीचा जल्लोष होता. स्पर्धा पूर्ण करण्याचाच आनंद तिथे अधिक होता.

अनेकांकडून ऐकले होते, एकदा तरी टाटा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला पाहिजे. त्या अनुभवासाठी आता काही तास बाकी होते. पहाटे साडेचारची कांदिवलीहून चर्चगेटला जाणारी लोकल पकडायची होती. इतक्‍या पहाटे एकट्याने कधी जायची वेळ न आल्याने थोडी धाकधूकच होती. पण अहोम्‌ आश्‍चर्य. स्त्रियांचा पूर्ण डबा मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या बायकांनी भरला होता. काय मुंबईकरांचा उत्साह. त्या क्षणाला मी ‘मुंबईकर’ असल्याचा अभिमान दुणावला. या वेळी मला वेळ लावून दहा किलोमीटर पळायचा हट्ट नव्हता. मला माझ्या मुंबईत जाऊन, सुंदर मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर धावून आनंद घ्यायचा होता. माझी मॅरेथॉन सहा वीसला चालू झाली. पूर्ण रस्ता रविवारच्या पहाटे मॅरेथॉन बघायला आणि धावपटूंना उत्तेजन देण्यासाठी लोकांनी भरलेला होता. काही उत्साही मुंबईकर स्वखर्चाने आणलेली चॉकलेट्स बिस्किटे वाटण्याचा आनंद लुटत होते, तर काही जण ढोल-ताशांनी आम्हाला स्फुरण देत होते. काही उड्डाण पुलावरून छायाचित्रे टिपण्यात मग्न होते, तर काही ‘कमॉन, यू कॅन डू इट. ओन्ली फाइव्ह हंड्रेड मिटर्स आर लेफ्ट टु रिच फिनिश लाइन’ असे जोराने ओरडत माझ्यासारख्या फिनिश लाइनजवळ आलेली असताना दमलेल्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत होते. एकमेकांशी जराही ओळख नसलेले स्पर्धक धाव पूर्ण झाल्यावर एकमेकांकडून व्यायाम करून घेण्यात मदत करत होते. हस्तांदोलन करून अभिनंदन करत होते.

या अभूतपूर्व विश्‍वातून मी बाहेर आले तेव्हा मला एकच जाणवले- मॅरेथॉन ही एक अशी स्पर्धा आहे, छे! स्पर्धा कुठली, हे तर एक संमेलन आहे. ज्यात अनेक वयोगटांतील स्त्री-पुरुष एकाच धावपट्टीवर एकत्र येतात. ज्यात कसलीही ईर्षा नसते, ज्यात कधी कोणी कोणाचा आर्थिक स्तर मोजत नाही, ज्यात कधी जाती-भेद होत नाहीत. यात फक्त एकच धर्म असतो, एकच जात असते तो माणुसकीचा धर्म. धावत असताना आपल्याबरोबरचा स्पर्धक काही कारणांनी चक्कर येऊन पडतो, तेव्हा आपले पळणे बाजूला ठेऊन त्याला प्राथमिक उपचार मिळेपर्यंत त्याला दिलासा देत राहतो, अशा खेळाला स्पर्धा कशी म्हणायची? धावताना सगळ्यांचे लक्ष्य एकच असते, पळून झाल्यावरचे दमणे सारखेच असते, त्या दमण्यापलीकडचा सगळ्या खेळाडूंचा आनंद, आत्मीक समाधानही एकच असते. अशी ही मॅरेथॉन मला फिटनेसच्या मंत्राबरोबर खूप काही आनंद आणि एकजुटीचे महत्त्व देऊन गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr aruna kelkar