ब्लॅक कॅट

डॉ. गोरखनाथ काळे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

त्या अमेरिकन गृहस्थांनी विचारले आणि मी त्यांना उत्तर दिलेही. पण मग मुलाने त्या गृहस्थांनी नेमके काय विचारले होते ते सांगितले, तेव्हा ते गृहस्थ माझ्याकडे शंकीत मुद्रेने पाहात का गेले, ते कळले.

त्या अमेरिकन गृहस्थांनी विचारले आणि मी त्यांना उत्तर दिलेही. पण मग मुलाने त्या गृहस्थांनी नेमके काय विचारले होते ते सांगितले, तेव्हा ते गृहस्थ माझ्याकडे शंकीत मुद्रेने पाहात का गेले, ते कळले.

मी आणि माझी पत्नी आमच्या मुलाकडे अमेरिकेत सॅन होजेला गेलो होतो. एके दिवशी सकाळी मी बंगल्याच्या पुढील अंगणात फुलांची रोपे लावत होतो. त्या वेळी समोरील रस्ता ओलांडून एक काळे मांजर धावत आमच्या बंगल्यासमोर आले. मी कुतूहलाने त्याच्याकडे पाहिले. थोडा वेळ थांबून ते मांजर समोरील पदपथावरून उजवीकडे निघून गेले. इतक्‍यात एका गृहस्थांनी माझ्या समोर येऊन अमेरिकन इंग्लिशमधून मला काहीतरी विचारले. त्यांचे इंग्लिश उच्चार उतके वेगळे होते, की मला ते नीट समजलेच नाहीत. केवळ ‘ब्लॅक कॅट’ हा शब्द तेवढा मला कळला. मला वाटले, की ते मांजर त्यांचे असावे आणि ते कोणत्या दिशेने गेले याबाबतची माहिती त्यांना हवी असावी. मी ते मांजर ज्या दिशेने गेले तिकडे बोट दाखवून तसे त्यांना सांगितले. तरी ते गृहस्थ थोडा वेळ थांबून, काहीशा साशंकतेने माझ्याकडे पाहून निघून गेले.

त्या दिवशी सुटी असल्याने माझा मुलगा व सून घरीच होते. आम्हां दोघांतील संभाषण मुलाने घरातून ऐकले होते. मी थोड्या वेळाने घरात गेल्यानंतर त्याने मला विचारले, की ते अमेरिकन गृहस्थ काय म्हणत होते. मी त्याला सांगितले, की ते म्हणत होते, ‘‘समोरील रस्ता ओलांडून एक मांजर इकडे आले होते का? आणि ते कोठे गेले?’’ त्यावर माझा मुलगा हसू लागला. मला काहीच कळेना. त्याला मी म्हणालो, ‘‘अरे हसतोस काय?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अहो बाबा, ते अमेरिकन गृहस्थ म्हणत होते, की एक काळे मांजर रस्ता ओलांडत असताना एका मोटारीखाली सापडणार होते. थोडक्‍यात वाचले. ते मांजर तुमचे आहे का?’’ त्यानंतर सर्व प्रकार माझ्या लक्षात आला आणि आम्ही सर्वजण हसू लागलो.

अमेरिकन लोकांचे इंग्लिश उच्चार वेगळे असतात. त्यामुळे ते बोलतात ते आपणास नीट न समजल्यामुळे, आपण वेगळाच अर्थ घेतो आणि त्यातून निर्माण होतो विनोद!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr gorakhnath kale