आई आणि शिकेकाई 

 डॉ. ज्योती गोडबोले
सोमवार, 2 डिसेंबर 2019

लंडनच्या लेक, नातीने शिकेकाई वापरण्यास नकार दिला. परदेश प्रवास करून आलेली शिकेकाई आदिवासी पाड्यात सुखाने रवाना झाली. 

लंडनला प्रथमच चाललेली वर्षा भेटायला आली होती. मुलगी गेली  ७-८ वर्षे लंडनला आहे. यंदा वर्षा तिच्याकडे चालली होती. सगळी तयारी मला दाखवताना तिने अगदी अपूर्वाईने शिकेकाईचे पाकीट दाखवले. मला म्हणाली, ‘‘बघ, किती सुंदर दळून आणलीय मी स्वतः! नागरमोथ्यासह सगळे घातलेय. माझ्या लेकीचे, नातीचे केस फार सुंदर आणि लांब आहेत. छान नाहायला घालीन दोघींना.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मी काहीच बोलले नाही. घरी आले तरी ती सुगंधी शिकेकाई मनातून जाईना. लहानपणी आमची आई अशाच शिकेकाईने दर रविवारी न्हाऊ घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. माका, ब्राह्मी आवळा घालून हिरवेगार तेलही ती घरीच करायची. रविवारचे न्हाणे हा मोठा कार्यक्रम असायचा. कडकडीत पाण्याने ती आम्हा बहिणींना न्हाऊ घालायची. खसाखसा केस पुसायची आणि दुपारी केस वाळले की त्या थंड हिरव्यागार तेलाने केसांना मालीश करून सुंदर वेण्या घालायची. गुंगीच यायची त्या सोहळ्याने. आता वर्षा नातीला कसे न्हाऊ घालते, याची उत्सुकता वाटायला लागली. ठरल्यावेळी वर्षा भारतात परतली. काही दिवसांनी मी भेटायला गेले. ते शिकेकाईचे पुडके टेबलावरच पडले होते. न उघडता तसेच! मी विचारले,‘‘ काय गं, हे वापरले नाहीस का?’’ ती म्हणाली, ‘‘नाही गं बाई! काय सांगू तुला, नातीला कौतुकाने विचारले तर म्हणाली आजी प्लीज! या असल्या पावडरने मी केस वॉश करणार नाही. माझा वेगळा शाम्पू असतो. सॉरी, पण या पावडरने माझा बाथटब किती खराब होईल गं! मुलीने तर बॉयकटच केलाय. नातीला दुजोरा देत ती म्हणाली, ‘‘आई, कसली शिकेकाई न कसले गं न्हाणे ते! आत्ताच घर रिनोव्हेट केलेय. याचे कार्पेटवर डाग पडले तर नुसता मनस्ताप होईल. म्हणूनच हे बापडे पुडके आले परत.

मी म्हटले, ‘‘सखे रुसू नको, रागावू नको. खिन्न होऊ नको. पुढच्या महिन्यात जाणारेस ना आदिवासी कॅंपला? तिकडे दे हे. अगदी योग्य स्थळी पडेल ही शिकेकाई.’’ वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई ठाण्याजवळच्या आदिवासी पाड्यात सुखासमाधानाने रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth-article-write by Dr. Jyoti Godbole

टॅग्स