गंभीर चेहऱ्याची दक्षता...

muktapeeth
muktapeeth

डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने वावरावे की नाही, हा काहींच्या चर्चेचा विषय असू शकतो. एका डॉक्टरला ही ‘दक्षता’ आवश्यक वाटते.

निवांतपणे पेपर चाळत कॉफीचे घोट घेत बसलो होतो. तेवढ्यात एकजण अचानक केबिनमध्ये आले. खरे तर मी थोडा वैतागलोच, पण चेहऱ्यावर तसे न दाखवता विचारले, ‘‘काय हवे आहे?’’ सद्गृहस्थांनी विचारले, ‘‘डॉक्टर, एक विचारू का?’’ आता मी जास्तच वैतागलो. एक तर परवानगी न घेता आगंतुक आत यायचे, वर साळसूदपणाचा आव आणून प्रश्‍न विचारण्याची परवानगी मागत असल्याचे नाटक. मी ‘हो’ म्हणायच्या आधीच त्यांनी विचारले, ‘‘सर, तुम्ही सारखे गंभीर चेहऱ्याने का वावरत असता? खरेच याची गरज असते का? तुम्ही जाता-येता कॉरिडोअरमध्ये साधी ओळख पण दाखवत नाही.’’ तो एक धक्काच होता मला. मी विचार केला, आपण असे वागतो का? असे वागण्याची खरंच गरज असते का? सावरत मी त्यांना सांगितले, ‘‘अहो, तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पण अतिदक्षता विभागात काही रुग्ण गंभीर असतात. काही चांगले असतात, तर काही मरणासन्न अवस्थेत असतात. असे असताना मी कुठले भाव चेहऱ्यावर घेऊन वावरायला हवे? मला भेटणारा नातेवाईक कुठल्या रुग्णाचा आहे, हे लक्षात ठेवणे अनेकदा कठीण असते. मी मरणासन्न रुग्णाच्या नातेवाइकांना स्मित हास्य करून चालणार आहे का?’’

अतिदक्षता विभागातील डॉक्टर कामावर असताना गंभीरच असावा. अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांना असे वाटते, की डॉक्टर आपल्याला ओळखतात. म्हणून त्यांना तशा प्रतिसादाची अपेक्षा असते. अर्थात, त्यात वावगे काहीच नाही. पण डॉक्टरांचीही अनेकदा अडचण अशी असते, की कोण व्यक्ती नेमक्या कोणत्या रुग्णाचा नातेवाईक आहे, हे बाहेर त्याला चटकन लक्षात येत नाही. त्यातही संबंधित नातेवाईक प्रकृती सुधारत असलेल्याचा नातेवाईक आहे, की अत्यवस्थ असणाऱ्याचा आहे यावर त्यांच्यातील संवादाची दिशा ठरणार असल्याने नातेवाइकांशी अनौपचारिक संवाद साधण्यात अडचण येते. शिवाय, क्षणाक्षणाला येत असलेले अपडेट्, सातत्याने सुरू असलेले राउंड्‍स आणि सपोर्टिंग स्टाफशी सतत साधावा लागणारा संवाद अशा व्यग्रतेत अतिदक्षता विभागातील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांशी त्यांना अपेक्षित पद्धतीने प्रतिसाद देऊ शकत नाहीत, असे मला वाटते. कॉफीचा घोट संपवून परत एकदा ‘गंभीर’ चेहरा करून केबिनबाहेर पडलो. अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना इतकी किमान ‘दक्षता’ घ्यावीच लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com