आणि दुचाकीची एक चाकी झाली!

डॉ. एम. बी. साबणे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

रात्री उशिरा घरी परतताना दुचाकीचे एक चाक निसटले. काहीही घडू शकले असते अशा वेळी. त्या क्षणी एक रिक्षावालेकाका मदतीला आले.

रात्री उशिरा घरी परतताना दुचाकीचे एक चाक निसटले. काहीही घडू शकले असते अशा वेळी. त्या क्षणी एक रिक्षावालेकाका मदतीला आले.

रात्र झाली होती. मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो होतो. तेथे अनेक जण भेटले. गप्पा-टप्पा, नव्या-जुन्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम यात उशीर झाला होता. सोसायटीतून बाहेर पडलो. दुचाकीला किल्ली लावली. दुचाकी चालूही झाली. आमचे घर दहा मिनिटांच्या अंतरावरच होते. रस्त्यावर गर्दी नव्हती. हवेत गारठा होता. कोणी तरी आपल्याला साद घातल्याचा भास झाला. अशा रात्री, थंडीत, अनोळखी रस्त्यावर आपल्याला कोण हाक मारणार? सादाला प्रतिसाद न देताच पुढे निघालो. काही अंतर गेलो आणि दुचाकीच्या अंगात आले. अचानक ती मद्य प्यायलासारखी हेलकावे घेऊ लागली. तरी चौकापाशी आलो आणि दुचाकी बंदच पडली. तोच पाठीमागून ‘अहो ऽऽ अहो’चा नारा देत एक रिक्षावाला आला. ‘‘अहो साहेब, तुमच्या गाडीचे चाक निखळले आहे,’’ असे त्याने म्हणेपर्यंत दुचाकीने अंगच टाकले. चाक रस्त्यावर आले. आम्ही दोघे फार दुखापत न होता रस्त्यावर पडलो. कसेबसे दोन पायावर उभे राहिलो.

रिक्षावालेकाका जवळ आले. धीर दिला. प्रसंगाचे गांभीर्य जाणवून दिले. चाक कसे निसटले असेल हे सांगितले. ‘चाकाचा नट इथेच जवळपास पडला असेल’ असे म्हणून मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात खूप लांबपर्यंत जाऊन नट शोधला. पडलेले चाक प्रयत्नांती पुन्हा गाडीला बसविले. त्या दरम्यान बोलताबोलता त्याचे नाव भगत एवढेच समजले. दुचाकी पुन्हा दोन चाकावर उभी केली. ‘‘तुम्हाला चालवता येणार नाही. अहो काका यांचा हात दुखतोय.’’ ‘‘बरे, काही हरकत नाही. जवळच्या सोसायटीत रात्रीसाठी ठेवू,’’ असे म्हणून ती अचलगाडी ढकलत एका सोसायटीपर्यंत आणली. सोसायटीच्या रखवालदाराला ‘उद्या सकाळी येऊन घेऊन जाऊ,’ असे सांगितले. ‘‘अहो, मीच तुम्हाला रिक्षाने घरी सोडले असते. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेथे माझी नाईट आहे!’’ असे म्हणून रिक्षावालेकाका निघून गेले. या प्रसंगाने माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr m b sabane