एका नारळाचा प्रवास

डॉ. प्रकाश भावे
मंगळवार, 28 जानेवारी 2020

नारळ आपल्या दैनंदिन जीवनात खूपच महत्त्वाचा असतो. पुण्यासारख्या शहरात नारळ किती हाती फिरतो, हे पाहणे मनोरंजक वाटावे.

नारळ आपल्या दैनंदिन जीवनात खूपच महत्त्वाचा असतो. पुण्यासारख्या शहरात नारळ किती हाती फिरतो, हे पाहणे मनोरंजक वाटावे.

धार्मिक पूजा, सण, सत्कार समारंभ असो, नारळ हा हवाच हवा. सार्वजनिक लोकप्रिय देवांना वाहिलेल्या नारळांच्या महाकाय ढिगांचे काय होते? चौकशी केली, तर खूपच मनोरंजक माहिती मिळाली. बाजारात दरमहा दोन ते अडीच कोटी रुपयांचे नारळ खपतात. ते येतात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून. आणि हो, थोडेसे कोकणातूनसुद्धा. प्रत्येक नारळाचे सरासरी वजन सहाशे-सातशे ग्रॅम असते. करवंटी दीडशे-दोनशे ग्रॅम, शेंडी इत्यादी पन्नास ग्रॅम वगळता खोबरे, पाणी यांचे वजन चारशे-पाचशे ग्रॅम भरते. प्रत्येक नारळाचे आयुष्य सर्वसाधारणपणे तीन महिने असते. त्यानंतर नारळ कुजतो तरी वा गोटा खोबरे होते. गर्दीनुसार, मागणीनुसार आणि नारळाच्या प्रतवारीनुसार प्रत्येक नारळाची किंमत असते. पंधरा रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत. भाविकाने तो खरेदी केला की भक्तांच्या रांगेतून तो श्रींच्या चरणी अर्पण होतो. प्रत्येक नारळ काही फोडला जात नाही. जो फोडला जातो, त्यातीलही प्रसाद म्हणून अर्धा नारळच पुजारी परत भाविकाला देतात.

या नारळांचे आणि नारळांच्या तोरणांचे रोजच्या रोज लिलाव होतात. एक नारळ एका दिवसात तीन-चार वेळा व्यापारी-भाविक-श्री-व्यापारी असा प्रवास करतो. मागच्या नवरात्रात प्रत्येक नारळाचा बाजारभाव सोळा रुपये, लिलाव दहा रुपये, तर विक्री प्रतवारीनुसार बारा ते पंचवीस रुपये असा दर होता. गणेशोत्सव व नवरात्र या दीड महिन्यात एकच नारळ किमान दहा वेळा तरी विकला जातो. या खरेदी-विक्रीत एकूण खरेदी किंमत आठशे रुपये होते आणि विक्रीतून सरासरी दोन हजार ते चौवीसशे रुपये मिळतात. दसऱ्याची गडबड संपली, की पुन्हा एकदा अखेरचा लिलाव होतो. ओले, चांगले नारळ उपाहारगृहे, खाणावळी चारशे रुपये शेकड्याने घेतात. सुके नारळ लसणाची चटणी वा खोबरेल तेल करण्यासाठी दोनशे रुपये शेकड्यांनी खपतात. अगदी छोटे नारळ सोनेरी वर्खाचा कागद चिकटवून दारावर लावण्याच्या तोरणात उपयोगी पडतात. फोडलेल्या नारळांच्या करवंट्या इंधन म्हणून पन्नास रुपये पोत्यामागे आणि सोललेल्या नारळाच्या शेंड्या कोंबडीचे खाद्य, पायपुसणी इत्यादीसाठी वीस रुपये पोत्यामागे. अशा रीतीने नारळाचा प्रवास संपतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr prakash bhawe