वृक्षांची विपश्‍यना

डॉ. विलीना इनामदार
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

आयुष्यात तणावांचे ताणेबाणेच अधिक. पण, फुलांसंगे विपश्यना केल्याने सारे तणाव दूर होतात.

आयुष्यात तणावांचे ताणेबाणेच अधिक. पण, फुलांसंगे विपश्यना केल्याने सारे तणाव दूर होतात.

जाईच्या मूक कळ्यांनी आज बोलका श्‍वास घेतला. आसमंतात मंद धुंद दरवळ पसरलाय. एवढ्याशा छोट्या फुलांची ही ताकद खरेच वाखाणण्यासारखीच! हा दरवळ माझ्या मनाच्या गाभाऱ्याला शांत करतो मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने. गुलाबी रंगाच्या लसण्यावेलाचा वाटेवरचा सडा इतका मोहक, की बघतच बसावा असा. वयाने प्रौढ झालेला, पण सर्वांना आपल्या वासाने चिरतरुण करणारा पिवळा चाफा म्हणजे बावनकशी सोनेच की! हे सगळे वर्णन आहे आमच्या जवळ असलेल्या संगम सोसायटीचे. श्रावण आणि भाद्रपदात येथे विविध फुलांचे संमेलन भरलेले असते. विविध फुलांमुळे येणारे शिंजीर, वेडा राघू, फुलपाखरे स्वच्छंदाने विहार करत असतात. माझ्या मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि टवटवीत राहण्यासाठी हा ‘वॉक’ मला हवाहवासा वाटतो.

कुंपणापलीकडून वाटेवर अलगद फुलांची पखरण करणारा पारिजातक घरंगळलेल्या फुलांचे सौंदर्यही अबाधित ठेवत असतो. मोगरीच्या मंडपावरील पांढऱ्याशुभ्र फुलांचा फुलोरा व परिमल पावसाळा सरत आला तरी कसा काय? कोड्याचे उत्तर त्याच्या फ्लोरिजेन निर्मितीचे, त्याच्या मालकिणीने केलेल्या त्याच्यावरील प्रेमाचे! रात्रीचा घमघमाट आसमंतात दरवळणारी रातराणी मात्र सकाळी मान खाली घालून स्तब्ध असते; पण परागी भवनानंतरच्या कार्यपूर्तीचे तेज चेहऱ्यावर मिरवत असते. जुई, कुंद, सायली, चमेली, पिवळा, पांढरा सोनटक्का, कुठल्याशा बंगल्यात फुललेला कवठीचाफा, कृष्णकमळाची नाजूक तंतुमय कोंदण तिचा मंद सुवास वातावरणाला धुंद करतो. पांढऱ्याशुभ्र रंगाची पण हिरव्याचुटूक पानांतून डोकावणारी कुंती या वाटेवरचे वैभव होऊन जातात. मुसांडाला वास नाही; पण त्याच्या लाल फुलांच्या भल्या मोठ्या पाकळ्या कालीमातेच्या जिव्हेच्या रूपाने दर्शन देऊन जातात. काल उंच आकाशाला गवसणी घालणारा कॅश्‍युरिना बघताच मला श्रीवर्धनच्या बीचवर लाटांशी मनसोक्त खेळलेल्या क्षणांची आठवण झाली. घरी बसून विपश्‍यना करण्यापेक्षा या सुगंधी संगमच्या सहवासातील ही वृक्ष-फुलांची विपश्‍यना मला रोज करावीशी वाटते, हे वेगळे सांगायला नकोच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr vilina inamdar