‘माउंट मेरा’ मोहीम

डॉ. योगेश पंचवाघ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

सलाइन, सुया, कृत्रिम प्राणवायू यांपासून दूर हिमालयात आम्ही डॉक्टर आलो होतो. निसर्गातील प्राणवायू भरभरून घेत होतो. शिखर गाठताना संघभावनेची शिकवण नव्याने मिळाली.

सलाइन, सुया, कृत्रिम प्राणवायू यांपासून दूर हिमालयात आम्ही डॉक्टर आलो होतो. निसर्गातील प्राणवायू भरभरून घेत होतो. शिखर गाठताना संघभावनेची शिकवण नव्याने मिळाली.

मध्यरात्र उलटून गेलेली. सगळीकडे अंधार. क्रॅम्पॉन लावलेले शूज घातले. हेड लॅम्प लावून मी चढाईसाठी सज्ज झालो. मी एका रोपवर होतो. सर्वांत पुढे होता तो आमचा वांगडा शेर्पा. त्याच रोपवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ सहकारी डॉ. धनंजय केळकर, डॉ. सुनील बापट, डॉ. मंजिरी जोशी व डॉ. केदार जोशी हेसुद्धा होते. आम्ही नेपाळमधून हिमालयातील माउंट मेरा शिखराकडे निघालो होतो. अंधारातच सुमारे सहा तास आम्ही चढाई करीत होतो. कधी गुडघ्यापर्यंत, तर कधी कंबरेपर्यंत बर्फ. आइस अॅक्स कौशल्याने वापरावी लागत होती. आणि पहाटे आम्ही मेरावर पाऊल टाकले. बरोबरचा तिरंगा हातात धरून छायाचित्र घेतले. शिखरावर नतमस्तक झालो आणि मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा करायचा तो बेस कॅम्पला परतूनच म्हणत उतरण्यास सुरवात केली.

गार्डीयन-गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगतर्फे आम्ही डॉक्टर मंडळींनी ही मोहीम आखली होती. मोहिमेचा कर्ताधर्ता डॉ. सुमीत मांदळे पुण्यापासूनच सोबत होता. डॉ. सुमीत अनुभवी गिर्यारोहक आहे. आम्हा डॉक्टर मंडळींसोबत मुंबईचा जय कोल्हटकर व पुण्याच्या रोहिणी उपासनीदेखील होत्या.

या आधी मी एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि गोक्योरी हे दोन ट्रेक केले होते. त्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे असे स्वरूप होते. या वेळी मात्र प्रत्यक्ष शिखरावर चढाई करायची होती आणि शिखर चढून सुखरूप खाली परत यायचे होते. आम्ही डॉक्टर मंडळी शस्त्रक्रियेची तयारी करतो त्याआधी रुग्णाच्या विविध चाचण्या करतो. मोहिमेचेही तसेच होते. रोजच्या हवामानाचा अंदाज घेऊनच आगेकूच व्हायची. प्रत्यक्ष चढाईचा पहिलाच अनुभव असल्यामुळे शरीर कशी साथ देईल याविषयी थोडी शंका, थोडी आशा, थोडा विश्वास असे संमिश्र भाव होते. डॉ. मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयारी चांगली केली होती, त्याचा फायदा झाला. आम्ही कात्रज-सिंहगड, सिंहगड-राजगड-तोरणा हे ट्रेक केले होते. शेवटचे दोन दिवस बर्फातून चालायचे होते आणि तेथेच कस लागणार होता. हाय कॅम्पला जाताना आम्हाला एव्हरेस्ट, ल्होत्से, नुप्त्से, चो यू, कांचनजुंगा ही शिखरे दिसली.

या मोहिमेत संघभावनेची शिकवण नव्याने मिळाली. एका रोपवर अनेक जण असणे, प्रत्येकाने ठराविक वेगाने चढाई करणे, ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करणे आणि मग उतरतानासुद्धा याची पुनरावृत्ती करणे यांतून खूप काही शिकायला मिळाले. शिखर चढाईचे ते काही तास कृत्रिम प्राणवायू, सलाइन, सुयांच्या दुनियेत वावरणाऱ्या आम्हा मंडळींसाठी खुसखुशीत प्राणवायू पुरविणारे ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr yogesh panchwagh