esakal | फिटे अंधाराचे जाळे!
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

फिटे अंधाराचे जाळे!

sakal_logo
By
गिरीश जाधव

माळावरच्या पालावर एक दिवा लावून आलो आणि तेथील अंधार किलकिला झाल्याचा अनुभवही घेतला.

पंधरा वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कंत्राटी पद्धतीवर नोकरीस होतो. विद्यार्थी-विद्यार्थिनींना मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देणे, माहितीपुस्तिकांची विक्री करणे, असे माझे काम होते. माझा कंत्राटाचा कालावधी संपत आला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर जाऊन परीक्षा साहित्य नेऊन द्यायचे होते. मी सोलापूरला पोचलो तेव्हा रात्र झाली होती. एका मैदानात मला भटक्‍यांची पाले दिसली. मी त्या रात्री या पालांवर मुक्काम केला. रात्री एक वाजेपर्यंत येथील मुलांबरोबर शिक्षणावर बोलत राहिलो. मुलेसुद्धा फार आनंदाने माझे बोलणे ऐकत होती. नंतर या मुलांच्या पालकांना मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी परीक्षेची माहिती दिली. पाचवी-सातवी नापास मुलांना ही पूर्वतयारीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करता येते. हे प्रमाणपत्र नोकरीसाठीही उपयोगी पडते. या मुलांना ही माहिती देऊन सकाळी मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघून गेलो. विद्यापीठाची नोकरी सुटूनही आता पंधरा-सोळा वर्षे झाली.

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून चालत चाललो होतो. अचानक एक तरुण माझ्यासमोर आला. म्हणाला, ‘‘मला ओळखलं का?’’ माझ्या काही लक्षात येईना. तोच म्हणाला, ‘‘नाही आठवणार. पंधरा वर्षांपूर्वी अचानक आमच्या पालावर आला होता. त्यावेळीच ठरवलं, शिकायचं.’’ संपत रामदास मोरे यांनी सांगोल्यातील केंद्रावर पूर्वतयारीची परीक्षा दिली. या पूर्वप्रमाणपत्रावर एका संस्थेमध्ये त्याला नोकरीसुद्धा मिळाली. नोकरी करत त्याने मुक्त विद्यापीठातून मराठी या विषयात पदवी मिळवली. याच विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये त्याने एम.ए. केले. आता तो सांगोल्यात नोकरी करून एक साप्ताहिकही चालवतो. संपतला भेटल्यावर मला खूपच आनंद झाला व त्याचा मला खूप अभिमान वाटला. ओठावर आले, ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’. येथे तर मी त्या रात्री सोलापूरच्या माळावरच्या पालावर एक दिवा उजळवून आलो होतो, याचा माझा मलाच अभिमान वाटला. असेलही ‘एकच पणती मिणमिणती’, पण तीच माळावरचा, पालावरचा सारा अंधार दूर करील.

loading image
go to top