बाप आणि बॉप्स

हेमलता अच्युत भालेराव
मंगळवार, 16 जुलै 2019

वडिलांविषयी पूर्वी भीती असे, आता भीतीची जागा प्रेमाने, मित्रत्वाने घेतली आहे. पण "बापा'चा "बॉप्स' होणे पटत नाही.

वडिलांविषयी पूर्वी भीती असे, आता भीतीची जागा प्रेमाने, मित्रत्वाने घेतली आहे. पण "बापा'चा "बॉप्स' होणे पटत नाही.

मी एकदा माझ्या नातीला म्हणाले, ""तुझ्या बापाला फोन दे गं!'' तिला केवढा राग आला. म्हणाली, ""बाप कशाला म्हणतेस. माझे पप्पा आहेत ते.'' बाप म्हणणे इतकें राग येण्यासारखे आहे का? "बाप' हा शब्द आपण कुठेही वापरतो की!. "तुझ्या बापाला घाबरतो काय? बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तसे झाले तर बापाचे नाव लावणार नाही. बापाचा माल आहे का?' या सगळ्या ठिकाणी बाप नावाचा वजनदार माणूस आहे. काळाबरोबर स्त्री समानतेसाठी बापाची पाटी कोरी झाली आणि आईचे नाव व आडनाव लावण्याची चांगली परंपरा सुरू झाली. तरीही पंख समर्थ झाल्यावर बापाचे नाव नसण्याचा सल उरतोच. आईची प्रतिमा कोणत्याही स्त्रीमध्ये बघता येते. परंतु बापप्रतिमा इतरत्र बघून आजही चालत नाही. पूर्वीच्या काळी बापाला "आबासाहेब, बापूसाहेब, नानासाहेब' म्हणून आदबीने संबोधले जाई. आज, "अहो बाबां'चा "अरे बाबा' झाला. आणि "बॉप्स', "पॉप्स', "डॅडा' अशा शार्टकट बापाची चलती झाली. बापाच्या नावाला आकार ऊकार कसलाही प्रत्यय जोडण्याची पूर्वी कुणाची बिशाद नसे. "अहो' शब्द कधीचाच हद्दपार झाला आणि आदर, शिस्त आदींनी कुटुंबाशी काडीमोड घेतला असे जुने जाणते म्हणू लागले.

नव्या पिढीने "आलास का बाबा' असे विचारत बापाच्या नात्यातील भयाची भिंत दूर केली. आणि "मस्तीची कुटुंबशाळा' निर्माण झाल्या. तरीही बापमाणसाचे मुलांबाबतचे शिस्तमुक्त, संस्कारमुक्त प्रेमाचे लवचिक धोरण कुटुंबातील सदस्यांना नेमके काय कुठे घेऊन जाईल? रोज एकत्र बसून मद्याचा आस्वाद घेत "हाय डॅड, हाय बच्चू' म्हटल्याने मूर्तिमंत भीती उभी, असे वाटणारा पूर्वीचा बाप आपल्या मुलांशी मोकळा श्‍वास सशक्तपणे घेईल काय? पुरुष बाप बनतो तेव्हा तो एक जबाबदार माणूस बनतो. जबाबदारीला मूल्य असतात. म्हणूनच बापाला फार तर बाबाच राहू द्यावे, पप्पाही चालेल आणि डॅडीसुद्धा. पण बॉप्स, पॉप्स, डॅडा ही विकृत संबोधने चित्रपट-नाटकातच शोभून दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by hemlata bhalerao