आमचा अंदमान प्रवास

जगदीश भणगे
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

उत्सुकता, चिंता आणि नंतर दुःख असा प्रवास करीत आमची सहल निघाली; पण अखेर अंदमानचा आनंद घेऊन परतलो.

उत्सुकता, चिंता आणि नंतर दुःख असा प्रवास करीत आमची सहल निघाली; पण अखेर अंदमानचा आनंद घेऊन परतलो.

सतीश भागवत, श्रीकांत आगाशे व अजित कुलकर्णी या मित्रांसह अंदमान सहलीची आखणी केली. सहलीचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर विमान कंपनीने परतीच्या विमानाची वेळ बदलल्याचे कळवले. आम्ही बंगलोरला निघणार तर खराब हवामानामुळे विमान रद्द झाल्याचे समजले. मग मुंबईमार्गे विमानाने केरळला जायचे ठरवले. सर्व एकवीस जणांची मुंबई-बंगलोर तिकिटे हाती आली. ही गडबड सुरू असतानाच अजित कुलकर्णी यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याची वार्ता मिळाली. क्षणभर सारे सुन्न. त्या दिवशी सकाळी आनंद, उत्सुकता, नंतर सहल रद्द होईल की काय, ही धास्ती आणि आता दुःख, निराशा अशी आमची मनःस्थिती झाली. त्याही परिस्थितीत संपूर्ण सहल पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा आम्ही केली; परंतु हॉटेल, स्थळदर्शन, विविध ठिकाणी जाणाऱ्या क्रुझ, मोटारी, बोट्‌स यांची तिकिटे रद्द करता येत नसल्याने आम्ही उर्वरित सतरा जणांनी जाण्याचे ठरले. अनेक प्रकारची माहिती काढणारा, स्वतःहून पुढे होऊन काम करणारा, करून घेणारा व मुख्य म्हणजे सहलीचा पुरेपूर आनंद घेणारा व इतरांनाही तो घ्यायला लावणारा अजित, आरती वहिनी यांच्या सहवासाला आम्ही मुकलो, हे मात्र निश्‍चित.

पोर्ट ब्लेअरमधील रस्ते चांगले व शहर स्वच्छ आहे. आशियातील सर्वांत जुनी सॉ मिल पाहिली. अंदमानातील मूळ रहिवासी असलेले जारावा, सेन्तेनेली, ओन्जेस, शोम्पेन्स या आदिवासींची माहिती घेतली. संध्याकाळी सेल्युलर जेलला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेल्या कोठडीत जाऊन स्मारकाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी बाराटांगला जाताना जारवा आदिवासींचे दर्शन झाले. मोटर बोटीतून जाताना एका बाजूला खारफुटीचे हिरवेगार जंगल आणि दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र असे मनोहारी दृश्‍य पाहायला मिळाले. लवणस्तंभ असलेल्या गुहा व चिडिया टापू येथे नयनरम्य सूर्यास्त पाहिला. आकाशातील विविध रंगांचे समुद्रात पडलेले प्रतिबिंब मन मोहवून टाकणारे होते. अंदमान प्रशासनाने रॉस बेट बंद ठेवल्याने ब्रिटिशांची जुनी राजधानी पाहता आली नाही. त्याऐवजी आम्ही वंडूर बीच येथून सूर्यास्त पाहिला. अथांग पसरलेला समुद्र, स्वच्छ किनारे व हिरव्यागर वनराईने नटलेली लहान मोठी बेटे यांनी मनाला भुरळ घातली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by jadish bhange