esakal | `सोबत’च्या निमित्ताने!
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

`सोबत’च्या निमित्ताने!

sakal_logo
By
जया जोग jaya.jog207@gmail.com

आपण हिंदीच्या प्रभावाने चुकीचे शब्दप्रयोग करू लागलो आहोत. मराठीतील विविध अर्थछटा हरवून बसतो आहोत. त्याचा आपणच विचार करायला हवा.

बन्याला ‘सोबती’ला घेऊन चिंगी शॉपिंगला निघाली. एका मोठ्या मॉलमध्ये गेल्यावर कुठल्या वस्तू‘सोबत’ काय काय फ्री मिळतंय याचा अंदाज घेत दोघं एकमेकां‘सोबत’ त्या वस्तू शोधू लागले. खरेदीनंतर बिल काउंटरच्या कॅशियर‘सोबत’ गप्पा मारताना त्यांना जवळच असलेल्या एका नव्या रेस्टॉरंटचा शोध लागला. तिथे गेल्यावर मोठ्या फ्लॉवरपॉट‘सोबत’ ठेवलेला बोर्ड त्यांनी पाहिला. बोर्डवर लिहिलं होतं ‘स्पेशल ऑफर’ एका थाळी‘सोबत’ एक कॉर्नेटो आइस्क्रीम फ्री. एकमेकां‘सोबत’ विचारविनिमय करून बन्या आणि चिंगी वेटरची वाट बघत बसले. हातात पॅड‘सोबत’ पेन घेऊन वेटर ऑर्डर घ्यायला आला. ‘जेवणा‘सोबत’ काही ड्रिंक हवंय का?' त्याने विचारले. दोन लस्सी ऑर्डर करून बन्या आणि चिंगी एकमेकां‘सोबत’ गप्पा मारू लागले. चकचकीत थाळ्यांमध्ये स्वादिष्ट जेवण समोर आल्यावर चिंगीनं भाजी‘सोबत’ पोळीचा एक घास घेत बन्याला विचारलं, "उद्या दिवसभरात तुझ्या‘सोबत’ बोलायला वेळ मिळणार नाही. आताच ठरवू या. आपण दोघंही दोन तीन दिवस घरात नसणार. तेव्हा तुझ्या आईच्या ‘सोबती’साठी नंदा वन्संना घरी बोलावू ना?’’

कसा वाटला हा ‘सोबत’चा आडवा तिडवा मारा? अशामुळे मराठी भाषेच्या सौंदर्याचा, प्रासादिकतेचा, डौलाचा, शुद्धतेचा पार फज्जा उडाला आहे. आता वरचाच परिच्छेद बघा ना, यात फक्त पहिल्या आणि शेवटच्या वाक्‍यातच ‘सोबत’ या शब्दाचा योग्य वापर केला आहे. बाकी सर्व ठिकाणी ‘बरोबर’च्या ऐवजी ‘सोबत’चा वापर केला आहे. मराठीमध्ये ‘बरोबर’ आणि ‘सोबत’ हे दोन शब्द वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. हिंदीमध्ये या दोन्हींसाठी एकच - ‘के साथ’ वापरले जाते, त्याचा हा प्रभाव. पूर्वी कुठेतरी कधीतरी आढळणारी ही चूक आता सर्वमान्य होऊ पाहात आहे. वर्तमानपत्र, टीव्हीवरच्या वाहिन्यांचे संवाद, नव्याने आलेले मराठी चित्रपट तरुणवर्गाची बोली सगळीकडे या ‘सोबत’ने धुमाकूळ घातला आहे. आणि शंभर जणांत एकाची चूक झाली तर तिला चूक म्हणायचं. पण नव्याण्णव लोकांनी तीच चूक केली तर ते ‘बरोबर’च असा बहुमताचा मूलमंत्र असल्यामुळे ‘सोबत’च्या चुकीच्या वापराला राजमान्यताही मिळू बघते आहे.

loading image