रिक्षावाला

का. स. जगताप
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

रिक्षावाल्यांविषयी तक्रारीच अधिक ऐकू येतात. पण, सगळेच रिक्षावाले वाईट नसतात. मला तरी चांगले रिक्षावाले भेटले आहेत.

रिक्षावाल्यांविषयी तक्रारीच अधिक ऐकू येतात. पण, सगळेच रिक्षावाले वाईट नसतात. मला तरी चांगले रिक्षावाले भेटले आहेत.

रिक्षावाला म्हटल्यावर नापसंतदर्शक शब्दच ऐकायला येतात. एका जागी गप्पा करीत बसतील. पण, गरजू प्रवाशाला रिक्षातून नेणार नाहीत. जरा माहिती नसेल रस्त्याची तर गाव फिरवून आणतील. आणखीही बऱ्याच तक्रारी ऐकायला मिळतात. पण, सगळेच रिक्षावाले वाईट नसतात. प्रसंगी काही रिक्षावाले देवदूत बनून मदतीसाठी धावूनच येतात. मला रिक्षावाल्यांचे अनुभव चांगले आले आहेत. जुलैमधली एक रात्र. मी हडपसरला साडेसतरानळी येथे १९७६ पासून राहत आहे. पावसाची संततधार थांबायचे नाव घेत नव्हती. त्या दिवशी सगळे घरीच होते, म्हणून मसालेभात केला होता. रात्री जेवण झाल्यावर दहाच्या नंतर माझ्या पत्नीस त्रास होऊ लागला. त्या काळी जवळपास वैद्यकीय सुविधा नव्हतीच. थोड्याच वेळात लक्षात आले, की ही साधी तक्रार नाही. घरगुती उपायांवर थांबण्यात अर्थ नव्हता. आता त्रास वाढलाच होता. त्या वेळी रिक्षा अगर बसची सोय नव्हती. जवळच बाळू चौधरी यांची फक्त एक रिक्षा होती. बाळू चौधरींना विनंती केली व नायडू हॉस्पिटलमध्ये पत्नीस दाखल केले. त्यामुळे पत्नी वाचली. जणू देवदूतच धावला होता.

दुसरी घटना १९८१ ची. त्या काळी प्रवासाचे मुख्य साधन सायकल असे. मी परत येताना हडपसरला रामटेकडीपाशी सायकलचा चिमटा तुटला व अपघात झाला. मी वेदनेने विव्हळत होतो. कोणी थांबून विचारायलाही तयार नव्हते. त्याच वेळी एक रिक्षावाला माझ्याजवळ आला. इतरांच्या मदतीने मला त्याने आपल्या रिक्षात बसवले आणि रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे माझा जीव वाचला. मी नगर जिल्ह्यात हिंगणगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो. उन्हाळ्याची सुट्टी लागली. गावी येण्यास निघालो. पत्नीला दागिने, मुलांना नवीन कपडे खरेदी केली. मुले-पत्नी एसटीत बसले. मुलांची नव्या कोऱ्या कपड्यांची पिशवी रिक्षातच विसरली. मी खूप खूप घाबरलो. गाडीतून उतरणार तोच रिक्षावालाच आमच्या दिशेने धावत आला. मलाच धीर देऊ लागला. आम्ही उतरल्यावर त्याने रिक्षात मागे कपड्याची पिशवी पाहिली आणि तो पिशवी द्यायला धावत आला होता. रिक्षावाले चांगले असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by k s jagtap