मित्रत्वाचे नाते

लौकिक शशांक इनामदार
शुक्रवार, 5 जुलै 2019

पुण्यापासून कोसो मैल दूर असलेल्या देशातही मित्र मदतीला धावला. तो देशच मित्रत्वाचे नाते जपणारा आहे.

पुण्यापासून कोसो मैल दूर असलेल्या देशातही मित्र मदतीला धावला. तो देशच मित्रत्वाचे नाते जपणारा आहे.

आयर्लंडला पदव्युत्तर पदवीसाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मी पुणे सोडले. नवीन कॉलेज, अभ्यास, मित्र सर्व मार्गी लागले आणि एका हॉटेलमध्ये छोटी नोकरीही मी करू लागलो. तेथील वरिष्ठ शेफ रामबीन यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी आपुलकीने चौकशी केली आणि नाताळच्या पार्टीला घरी येण्यासाठी आमंत्रण दिले. माझे काम संपल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. उभयतांनी केलेल्या पाहुणचाराने मी भारावून गेलो. परत निरोप देताना स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन कधी अडचण आली तर फोन कर असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच-सहा दिवसांनी घडलेला हा प्रसंग. वर्षाच्या अखेरची रात्र, माझे स्ट्रॅंड हॉटेलमधील काम संपवून मी लिमरीकहून शॅनॉनला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभा होतो. रात्री सव्वानऊचा सुमार. बस येईना, कॅबशी संपर्क होईना. पंचवीस किलोमीटरचे अंतर. बरोबर कोणीच नाही. मित्रांचे घरून फोन, "कधी पोचतोस?' काय करावे सुचेना. अचानक हवा बदलली, सुनसान रस्त्यावर प्रचंड पाऊस, वादळी वाऱ्यांनी झाडांच्या कर्रकर्र आवाजाबरोबर धरलेली जुगलबंदी. सगळा पहिलाच अनुभव!

अचानक रामबीनना फोन करावा असे मला वाटले. फोन केला तर ते आज ड्यूटीवर नव्हते. कुटुंबीयांबरोबर ते बाहेर होते. त्यांनी गाडी चालवत असतानाच माझा फोन घेतला. मी माझी अडचण त्यांना समजावून सांगितली. खरे तर ते कुटुंबाबरोबर सुटीचा आनंद घेत होते; पण तरीही त्यांनी मला बसस्टॉवरच थांबायला सांगितले. रात्री सव्वाअकरा वाजता ते बसस्टॉवर आले आणि काही मिनिटांत मला त्यांनी शॅनॉनच्या राहत्या घरी सुखरूप पोचवले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मी बरोबर बारा वाजता माझ्या घरी मित्रांमध्ये पोचलो; केवळ रामबीनमुळेच. रामबीन मूळचे नेपाळचे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्या दिवशीच्या प्रसंगाने रामबीन यांच्यातील माणुसकीचे दर्शन जवळून घडले. आयर्लंडची जगात ओळख आहे ः मित्रत्वाचे नाते जपणारा देश. त्याचीही प्रचिती मला आली, पुण्यापासून कोसो अंतर दूर असलेल्या या देशात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by laukik inamdar