परीक्षाच होती ती!

लक्ष्मीकांत कुलकर्णी
Wednesday, 25 December 2019

काही वेळा पेच पडतो. अगदी इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती होऊन जाते. अर्थात हा परीक्षेचा काळही संपतो.

काही वेळा पेच पडतो. अगदी इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती होऊन जाते. अर्थात हा परीक्षेचा काळही संपतो.

मी नुकताच नोकरीसाठी पुण्याला आलो होतो. वडिलांचे निधन झाल्यानंतर दुःख साहवत नसल्याने आईला चक्कर येण्याचा, रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. तिच्या प्रकृतीची काळजी लागून राहिलेली. वडील वारल्यानंतर महिन्याभरातच मोठ्या भावाला मुलगा झाला होता. भाऊ-वहिनी दोघेही नोकरी करीत असल्यामुळे बाळाला सांभाळण्याचे काम आई करू शकणार होती. पण तिला ठाण्याची हवा मानवत नव्हती. त्यामुळे आईने पुण्यातच राहणे योग्य होते. खरेतर, नातवात मन रमल्याने आईचे दुःख नक्कीच हलके होणार होते. काय करावे हेच सुचत नव्हते. पण भाऊच म्हणाला, की तो त्याच्या बाळाला आईजवळ पुण्याला ठेवेल. वहिनीला हा निर्णय सांगायला भावाला खूपच जड जात होते. पण धीर एकवटून भावाने वहिनीला सांगतले, की ‘‘आपल्या बाळाला थोडे महिने पुण्याला आईकडे ठेवू. लहान बाळाचे करण्यात आईचा थोडा वेळ जाईल आणि आईला बरे वाटेल. वडील गेल्यानंतर तो नातूच आईला दुःखातून बाहेर काढू शकेल. आई लहान बाळाची सर्व व्यवस्थित काळजी घेईल.’’ मनावर दगड ठेवून भावाने वहिनीला समजावले. वहिनीने नाईलाजाने या गोष्टीला होकार दिला. वहिनी बाळाच्या आठवणीने रडत असे. तिचे दुःख अनावर होत असे, ते आम्हाला सर्वांना समजत होते. भाऊ, वहिनी शनिवारी-रविवारी येऊन बाळाला भेटत होते.

मी व आईने भावाच्या मुलाला काळजीपूर्वक दीड वर्षांचा होईपर्यंत सांभाळले. एकदा तर बाळ आजारी पडले व ताप डोक्‍यात गेल्याने बाळाला मध्यरात्री रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. मी व आई खूप घाबरून गेलो होतो. यातून काही उद्‌भवले तर या विचारानेच खूप खचून जायला झाले होते. इकडे आईला बरे करताना, पुतण्याचे काय होणार? याची धास्ती मनात बसली, पण सर्व व्यवस्थित झाले. तो तापातून पूर्ण बरा झाला. आईपण नातवाच्या जवळ असल्याने दुःखातून बाहेर पडली. परीक्षेचा काळ संपला अखेर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by laxmikant kulkarni