आजीची सावली

माधवी जगताप
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

लालबीभाभी आपल्या नातीसाठी अनेक सप्तरंगी स्वप्न घेऊन बसली आहे. आजीच्या त्या थकल्या-भागल्या डोळ्यांत नातीसाठीची स्वप्न ही मखमली दुलईसारखी आहेत.

लालबीभाभी आपल्या नातीसाठी अनेक सप्तरंगी स्वप्न घेऊन बसली आहे. आजीच्या त्या थकल्या-भागल्या डोळ्यांत नातीसाठीची स्वप्न ही मखमली दुलईसारखी आहेत.

स्वतः दिवसभर कष्ट करत घारीसारखे आपल्या नातीवर लक्ष ठेवणारी आजी म्हणजे आमच्या लालबीभाभी. भाभीची नात पहिलीत दाखल झाली अन्‌ आजीला कधी नव्हे तो स्वतःचा अडाणीपणा बोचू लागला. आता ही बरोबर लिवते का चुकीचे वाचते आपल्याला कसे कळणार, या विवंचनेत आजी पडली. पण ‘मैं हूँ ना!’ म्हणत मी भाभीला धीर दिला. भात शिजवता-शिजवता मायेची पावले सतत नातीच्या वर्गाजवळ घुटमळू लागली. ‘‘माझी नात हुशार हाये, किती बी शिकवणार. तुझ्यागत तिला सोताच्या पायावर खडी करणार. माझी नात कशात माग नाय राहिली पाहिजे, तिला काय वस्तू लागते तुम्ही सांगा. मी लगेच देते.’’ एखादी गोष्ट तुमच्या नातीला जमत नाही म्हटले, की ही आजी तिच्या मागे लागणार. पिच्छा पुरवणार. उद्देश एकच, जसे श्‍यामच्या आईला वाटायचे की माझ्या श्‍यामला कोणी नावे ठेवू नयेत, तशी ही आजी...! अभ्यास, चित्र, नाट्य, नृत्य, गायन काहीही असो, आजी सावलीसारखी तिला सोबत करणार.

परवा पूरग्रस्तांसाठी मुलांनी जमेल तसा निधी गोळा करा म्हणताच, आजी नातीला घेऊन परिसरातून जवळपास दीड हजार रुपये निधी गोळा करून आली. स्वतः रोज काबाडकष्ट करून जगणारी, पण इतरांच्या चहाच्या कपाला मिंधे न राहण्याचा पाठ शिकावा तो या भाभीआजींकडूनच! तोच बाणा नातीमध्ये संस्काररूपात झिरपत आहे. आजी नावाचे पिकले पान नातवंडांसाठी फार गरजेचे असते. प्रेम आणि शिस्त याचा योग्य प्रकारे ताळमेळ बसवू शकतात ती ही ज्येष्ठ माणसं. कारण पिकल्या केसांबरोबर अनुभवाची खाण त्यांच्यासोबत असते. लालबीभाभी आपल्या नातीसाठी अनेक सप्तरंगी स्वप्न घेऊन बसली आहे. आजीच्या त्या थकल्या-भागल्या डोळ्यांत नातीसाठीची स्वप्न ही मखमली दुलईसारखी आहेत ती न टोचतात, न बोचतात उलट इतर ज्येष्ठांना प्रेरणाच देतात. त्यामुळे राहून-राहून वाटते अशी आजी प्रत्येक नातीला मिळाली तर...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhavi jagtap