टोळीची दहशत

माधवी जगताप
Wednesday, 18 December 2019

टोळीने वावरणाऱ्यांची दहशत असते. माकडांची टोळीही त्याला अपवाद नाही. अख्ख्‍या गावावर टोळीने दहशत निर्माण केली होती.

टोळीने वावरणाऱ्यांची दहशत असते. माकडांची टोळीही त्याला अपवाद नाही. अख्ख्‍या गावावर टोळीने दहशत निर्माण केली होती.

गावात अगदी माकडांचा सुळसुळाट झाला होता. माकडांच्या टोळीची चांगलीच दहशत होती गावावर. टोपल्यात भाकरी राहात नव्हती. पोरांच्या हातात खाऊचा पुडा दिसला की पळवलाच म्हणून समजा. अक्षरशः शाळेत जाताना मुलांना हातात वही-पुस्तक घेऊन जावे लागे; कारण पिशवी दिसली, की पिशवी माकडाच्या हातात झाडावर आणि मूल रडत शाळेत. बिच्चारी मुले तर खाऊ दुकानातच खाऊन मग घरी जात. कारण माकडांची भीती. घराबाहेर वाळायला टाकलेले कपडे अंगावर घालून मिरवणे हा नवीन छंद माकडांनी जोपासला होता. त्या दिवशी कपड्यांची राखण करीत छकुली बसली होती. भला मोठा छकाटा तिच्या हाताशी. अजून आईची साडी वाळायची बाकी होती. मग ती खेळायला मोकळी. अचानक उधळत एक माकडांची टोळी आली. त्यातील एक अगोचर माकड अगदी जवळ आले आणि लागले की साडी अंगाभोवती गुंडाळायला. ते पाहताच छकुलीचे पित्त खवळले. तिने छकाटा फेकला आणि तरातरा माकडाजवळ जाऊन माकडाच्या मुस्काटात लगावून दिली. बोलून-चालून माकडच ते! त्याला डिवचल्यावर ते चवताळून छकुलीच्या अंगावर धावले. संपूर्ण टोळीच आली त्या माकडाच्या मदतीला. एकच दंगल सुरू. आरडाओरडा ऐकून घरातली माणसे अंगणात आली. समोरचे दृश्‍य पाहून घाबरून गेली. पोर माकडांच्या टोळीत. सभोवती माकडे आणि मधेच पोर. आता काय करावे? दगड फेकून मारावे, लाठीमार करावा तर पोरीलाच लागण्याची भीती..! हतबल होऊन हुसकाविण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर साडी आणि छकुलीला तिथेच टाकून माकडांची टोळी पळाली. पण, साडी वाचवण्यासाठी छकुली माकडांच्या तावडीत रक्तबंबाळ झालेली पाहून तिच्या आईचे डोळे भरून आले. तिने लागलीच छकुलीला कवटाळले. दवाखान्यात दाखल केले. तेव्हापासून गावकऱ्यांनी माकडांचा बंदोबस्त करण्याचे मनावर घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhavi jagtap