प्रवासी कुटुंब

माधुरी बुटाला
Tuesday, 17 December 2019

समवयस्क व्यक्तींचा सहवास हे ‘हेल्थ टॉनिक’ आहे. म्हणून ज्येष्ठांनी एकत्र येऊन सुंदर आयुष्याचा आस्वाद घ्यायला हवा.

समवयस्क व्यक्तींचा सहवास हे ‘हेल्थ टॉनिक’ आहे. म्हणून ज्येष्ठांनी एकत्र येऊन सुंदर आयुष्याचा आस्वाद घ्यायला हवा.

आमचे प्रवासी कुटुंब म्हणजे बँकेतून निवृत्त झालेले काही मित्र. साधारण वय वर्षे साठ ते ऐंशी. आम्ही देश-परदेश सहली सहकुटुंब करतो. या वेळी आम्ही गोव्याला गेलो. अनेकांनी गोवा पाहिला होता, पण या सहलीचे वैशिष्ट्य होते दूधसागर धबधबा आणि कोकण रेल्वेचा प्रवास! दूधसागर धबधबा दुथडी भरून वाहत होता. आम्ही पहिला दहा-बारा किलोमीटर प्रवास जीपने केला. ही जीप दोन-तीन वेळा मोठ्या ओढ्यातून पाणी उडवत जाते. वेडीवाकडी वळणे, चिखल आणि खड्डे. ड्रायव्हरच्या कौशल्याचे कौतुकच आहे. नंतर वीस-पंचवीस मिनिटे चालत गेलो. आडवाटेचा, दगडगोट्यांचा व पाण्यातून जाणारा मार्ग, आम्ही एकमेकांच्या साह्याने पार केला. मांडोवी नदीवरील तो शुभ्र फेसाळलेला प्रपात! अफाट, अचाट व विराट. दूधसागर पाहतच शीण नाहीसा झाला. तो पाहण्यात व तेथपर्यंत पोचण्यात थरार आहे. ‘चेन्नई एक्‍सप्रेस’ चित्रपटातील दृश्‍ये येथील आहेत. तेथून परतावेसे वाटतच नव्हते. एक दिवस प्रसिद्ध मंगेशी मंदिर व शांतादुर्गाचे दर्शन घेतले.

परतीचा प्रवास ‘कोकण कन्या’मधून. अर्थात नाश्‍ता स्टेशनवरच! तसाच टाइमपास आणि एकमेकां साह्य! हा प्रवास अप्रतिम होता. निसर्गसंपन्न कोकणभूमी! माड, पोफळी, आंबा, केळीच्या बागा, काजू, फणस व रातांब्याची झाडे आणि वाऱ्यावर झुलणारी भातशेती. कोकण रेल्वेचे बांधकाम अवघडच होते. प्रवास हा आपण नेहमीच करतो; पण मानवी मनाचा एक पैलू मी अनुभवला. गोवा स्टेशनवर दोन मंगलोरहून आलेल्या तरुणी आमच्या गंमती जमती बघत होत्या. त्यांनी जवळ येऊन आमचे कौतुक तर केलेच; पण मनातली एक खंत व्यक्त केली की, ‘तरुण पिढीच्या व्यग्र जीवनशैलीमुळे, लक्ष्यलक्षी नोकरीमुळे किंवा प्रकल्पांच्या निश्चित केलेल्या तारखांमुळे मनात असूनसुद्धा आई-वडिलांना वेळ देणे जमत नाही. आमचे पालक असा प्रवास करतील तर आनंदच होईल.’ मला वाटते, जेथे जेथे ज्येष्ठांचे समूह असतील, तेथे त्यांनी आपापल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक सक्षमतेने आपापली जागा शोधून सुंदर आयुष्याचा आस्वाद घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhuri butala