मायमराठीची गोडी

महेश मुरलीधर भागवत
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मातृभाषेपासून दूर असताना मातृभाषेची ओढ अधिक लागते. तेलंगणामधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या मनात उसळलेल्या या भावना.

मातृभाषेपासून दूर असताना मातृभाषेची ओढ अधिक लागते. तेलंगणामधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या मनात उसळलेल्या या भावना.

संत ज्ञानेश्वरांना अमृतासी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य जिच्यात असल्याचा अभिमान वाटला, त्या मायमराठीची गोडी खरेच लाजवाब आहे. साडेसातशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या या मायमराठीने आपल्याला काय दिले नाही! सर्वसामान्यांसाठी भगवद्‍गीतेचा अर्थ निरूपण करणारी ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) सांगितली तेव्हा माउलींचे वय होते अवघे सोळा. ‘पसायदाना’द्वारे त्या विश्वात्मक देवाकडे सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करण्यासाठी प्रार्थना केली. भागवत धर्माचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांनी ‘असाध्य ते साध्य करण्या सायास’ म्हणत खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडवून आणली. ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी’ ही आरती आणि ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती बहुतेक सर्वांना मुखोद्‍गत असली तरी त्या आरत्या समर्थ रामदास स्वामींनी लिहिल्याचे किती जणांना माहिती आहे? अर्वाचीन साहित्यात बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन’ ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. केशवपनाच्या अनिष्ठ प्रथेवर हल्ला चढविण्याचे धाडस त्या काळात त्यांनी केले आणि त्यामुळे यमूचे दुःख एकट्या यमूचे दुःख न राहता सर्व मानवजातीचे दुःख झाले. ‘मज सांगून गेला भीमराव’ म्हणत दलितांच्या दुःखाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वाचा फोडली. सावित्रीबाईंना जोतिबांबरोबर स्त्रीशिक्षणासाठी राहते घर सोडावे लागले. त्या वेळी त्यांनी जर घर सोडले नसते, तर आजही आमुच्या सावित्रीच्या लेकी चार भिंतींत बंदिस्त राहिल्या असत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा रात्री दोन वाजता लिहीत बसलेले एका पत्रकाराने पाहिले आणि विचारले, ‘‘बाबासाहेब, सर्व नेतेमंडळी झोपली, एवढ्या उशिरापर्यंत आपण काय करता?’’ तेव्हा बाबासाहेबांचे उत्तर होते, ‘‘ती नेतेमंडळी झोपली, कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मला जागायलाच हवे, कारण माझा समाज झोपला आहे.’’ झोपलेल्यांना जागे करण्याचे काम आपल्या लेखणीच्या प्रभावाने या समाज सुधारकांनी, साहित्यिकांनी केले, त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो. त्यांचे मराठी सारस्वतांसाठीचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे.

मराठी पाऊल नेहमीच पुढे पडत राहो आणि या सारस्वतांची सेवा करण्याचे भाग्य तुम्हा-आम्हा सर्वांना आणि आमच्या भावी पिढीलाही प्राप्त होवो हीच ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिना’निमित्त सदिच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mahesh bhagwat