ती गेली आणिक...

मनीषा ओसवाल
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

‘आई’ या दोन अक्षरांत आपले सारे जग सामावते. ती गेली की या जगातील आपले पोरकेपण तीव्रतेने जाणवते.

‘आई’ या दोन अक्षरांत आपले सारे जग सामावते. ती गेली की या जगातील आपले पोरकेपण तीव्रतेने जाणवते.

आई-वडील हे आपल्या जीवनाचे दीपस्तंभ असतात. आई-वडिलांचे प्रेम, आधार, मार्गदर्शन आपल्या जीवनाला चांगली कलाटणी देतात. माझ्या आई-वडिलांनी अतिशय कठीण परिस्थितीतून खडतर प्रवास सुरू करत जीवन सार्थक केले. नगरमध्ये दुष्काळ पडला होता. यामुळे बाबांनी उत्तमनगर येथे किराणा दुकान सुरू केले. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्या वेळी आईने एक कूकर घेऊन त्यावर संसार सुरू केला. आईने खंबीरपणे उभे राहून बाबांना व्यवसायामध्ये साथ दिली. बाबांचे अचानक अपघाती निधन झाले. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला; पण आईने आपले दुःख बाजूला ठेवून आम्हा बहीण-भावांना हाताशी धरून पुन्हा किराणा दुकानात काम सुरू केले. कणखरपणे आईने जवळजवळ पंचवीस वर्षे दुकानदारी केली. आम्हा बहीण-भावांचे लग्नकार्य, डोहाळे जेवण, बारसे असे अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने केले. आम्हाला कधी बाबांची उणीव भासू दिली नाही.

आई आमची खूप सोशिक होती. स्त्री जेव्हा एकटी असते तेव्हा तिला समाजात वावरताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आईने अनेक दुःख, संकटे समर्थपणे पार पाडली. आईने भरपूर कष्ट उपसले. तिने कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत. आईच्या मनात कोणाविषयी द्वेष, मत्सर नव्हता. मनाने अगदी सरळ होती. आई माझी प्रेमाचा डोंगर आणि मायेचा सागर होती. दुकानात गिऱ्हाइकांना भरभरून प्रेम दिले, त्यांची काही अडचण असेल तर आईने त्यांना आर्थिक मदत केली. आई परोपकारी होती. तिने आम्हाला भरभरून प्रेम दिले. सारे गाव तिला ‘बाई’ या नावाने ओळखे. आईला जैन समाजात ‘आदर्श माता’ पुरस्कार मिळाला. आई धार्मिक होती. नेहमी उपवास करत होती. तिच्या हातचा स्वयंपाक अतिशय रुचकर असायचा, त्यामुळे अनेक जणांचे मन संतुष्ट झाले. ती अन्नपूर्णा होती. ती अचानक हे जग सोडून गेली आणि आम्ही पोरके झालो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by manisha oswal