हास्य

मीनल धायगुडे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नसण्यातही हसण्याची कला आत्मसात करायला हवी. हसून ताणांना हरवायला हवे.

नसण्यातही हसण्याची कला आत्मसात करायला हवी. हसून ताणांना हरवायला हवे.

मी खडकी कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करते. नोकरीनिमित्त मला रोज स्वारगेट ते खडकी बाजार असा बसचा प्रवास करावा लागतो. अशीच एकदा मी दुपारी बसने घरी जात असता वाटेत बस जरा थांबली होती. माझे लक्ष खिडकीबाहेर गेले आणि एका दृश्‍याने लक्ष वेधून घेतले. पदपथावर एका मजूर कुटुंबाचा संसार मांडलेला होता. त्या कुटुंबातील स्त्री तिच्या छोट्या बाळाला जेवण भरवत होती आणि त्या बाळापेक्षा थोडी मोठी मुलगी आईच्या मागे लपत होती आणि परत चेहरा दाखवत त्या बाळाला खेळवत होती. सुंदर नसूनही मला त्या क्षणी ती खूप सुंदर वाटली. कारण तिचे हास्य आणि मग तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद. त्या दोघांचे असे वेगळेच जग होते. बाकीच्या जगाचा जणू त्यांना विसरच पडला होता. काय होते तिच्याजवळ, ना अंगभर कपडे, ना पोटभर जेवण. पण तिचे आणि तिच्या छकुल्या भावाचे ते सुंदर हास्य कुठल्याच कॅमेऱ्यात टिपता येण्यासारखे नव्हते. एखाद्या लखपतीलासुद्धा इतका आनंदी होता येणार नाही इतकी आनंदी होती ती.

आमची बस निघाली. ते दृश्य अजून नजरेसमोरच असल्यागत. मला वाटून गेले, हा आनंद आजकाल दुर्मीळ होतो आहे का? हसण्यापेक्षा चिंताच जवळच्या झाल्यात का आज बहुतेकांना? जेव्हा भोवती अनेक ताण घेऊन जगणारे चेहरे बघते तेव्हा वाटते, त्यांनी या मुलीची सकारात्मकता घ्यायला हवी. नसण्यातही हसण्याची कला जवळची करायला हवी आणि प्रत्येकाने एकदा तरी असे दिलखुलास हसायला हवे. ज्यात भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता वाहून जाईल, विसरून जाईल. माणसांचे अनेक आजार कमी होतील. अशी आनंद देणारी माणसे आणि प्रसंग आपल्याभोवती असतील ती बघायची दृष्टीही आपल्याला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by meenal dhaygude