पार्सल

मेघना फडणीस
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पार्सल पाठवणे आता होईना, पण तिकडून येईल कदाचित पार्सल ही आशा सुटेना.

पार्सल पाठवणे आता होईना, पण तिकडून येईल कदाचित पार्सल ही आशा सुटेना.

पावसाळी ढग जमिनीवर उतरण्याआधीच मुलाचे पार्सल पाठवण्यासाठी पॅकिंग करून एकदाची मी रिक्षात बसले. पार्सल ऑफिसमध्ये जाऊन पडू दे रे देवा... पावसा तोपर्यंत धीर धर हो. माझ्यातल्या आईची आर्त आळवणी. पार्सल देऊन ऑफिसची पायरी उतरताना डोळ्यांत आर्त आस लावून, एक वाळून हडकुळलेली बाई कुरियरबॉयला, ‘माझे पार्सल आले का?’ म्हणून विचारत होती. ‘‘अहो ताई, आठ दिवस येताय, कुठून येणार तुमचे पार्सल? आणि आमच्याकडे आले तर पोहोचवू ना तुमच्याकडे... इथे यायची काय गरज?’’ त्याचा करवादलेला आवाज मला डाचला. अरेच्या, या बाईंना कुठेतरी पाहिलेय मी. त्यांचा एकुलता एक मुलगा, सून अमेरिकेत उच्चपदस्थ आहेत. मी न राहवून हळूच त्यांना हाक मारली... ‘सरोजामावशी...’ त्या बाई किंचित भांबावल्या. मी ओळख सांगितल्यावर चेहराभर हसल्या. आम्ही दोघी डेक्कनच्या कोपऱ्यापर्यंत गप्पा मारत चालू लागलो.

त्या सांगू लागल्या... नवरा असेपर्यंत सगळे ऑल वेल होते गं! पण अचानक ते गेले. तरीही लेकाने आईची विचारपूस चालूच ठेवली होती. मीही एवढे तेवढे पार्सल पाठवत होते, पण आता माझे हातपाय थकलेत, पैशांची पुंजी सरू लागलीय. दुखण्यांची मांदियाळी झाली अन्‌ अशातच अमेरिकेनेही रसद तोडलीय की काय कळत नाही. मुलगा, सून कामात असतील, नातवंडेही अभ्यासात असतील या समजुतीत दिवस काढतेय. या वर्षी दिवाळीला फराळाचेही नाही पाठवू शकले, याचीच खंत वाटते. अगं, एवढे मोठे पार्सल उचलताना आपल्या मुलांना चांगले खाऊपिऊ घालू शकतोय यातच आनंद असायचा गं! त्यामुळे खांदे दुखले काय किंवा पाठीत कळ कधी आली नि गेली याचेही भान नसायचे. पण... आता होत नाही. स्वतःचेच ओझे वाहतेय कण्हतकण्हत. देव नेईल तर बरे, पण भोग संपायचेत. कधीतरी वाटते ग तिकडूनही येईल माझे पार्सल म्हणून घिरट्या घालते हो इथे! मला माहितीय पार्सल घरी येत... पूर्वी नव्हती का येत... पण न जाणो चुकून तेही अडगळीत पडले तर!
डेक्कन कॉर्नर आला नि आमचे दोघींचे मार्ग वेगळे झाले. सरोजामावशींच्या धगधगत्या सत्याने माझे काळीज जळतच राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by meghana fadnis