सहकाऱ्यांच्या सवयी

मोहन दिनकर गोखले
सोमवार, 2 डिसेंबर 2019

नोकरीतून निवृत्त झालो. पण, पूर्वीच्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या सवयी आठवत राहतात. कधी त्याचा त्रासही झाला असेल, पण आता गंमत वाटते.

नोकरीतून निवृत्त झालो. पण, पूर्वीच्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या सवयी आठवत राहतात. कधी त्याचा त्रासही झाला असेल, पण आता गंमत वाटते.

आमच्या एका सहकाऱ्याला नाटकांत भूमिका करायची आवड. वेळी-अवेळी नाटकातले संवाद म्हणत असे. संगणक युग यायचे होते. सगळी कामे हात-मान मोडून चालायची. तर याचे सुरू व्हायचे, ‘चंदर, ज्यांच्या ज्यांच्याशी तुझ्यासाठी वैर घेतलं, त्यांच्या पायावर नाक घासीन आणि मग जो ताठ उभा राहीन तो केवळ तुला मात देण्यासाठी, बेईमान.....’ असा संवाद असायचा. आम्ही त्याला सांगायचो, ‘बाबा रे, ते संवाद वगैरे ठीक आहे. साहेबांनी ऐकलं तर?’ दुसऱ्‍या एकाला शब्दकोडी सोडवायचा छंद होता. आम्ही त्याला ‘चौकटीत राहणारा’ असेच म्हणायचो. आम्ही बॅलन्सिंगचा फरक शोधत असू, तेव्हा हा ‘अरे, सत्ता या शब्दाला दोन अक्षरी पर्यायी शब्द काय आहे रे?’ असे विचारत असायचा. ‘बाबा रे, मानेवर खडा ठेवून आम्ही आयुष्याचे कोडे सोडवायचा प्रयत्न करतो आहोत. ते सुटता सुटत नाही आणि शब्दकोडी कुठे सोडवायची?’ एक म्हणायचा, ‘बंधू, इन लोगोंने मुझे समझाही नही।’ आम्ही त्याला विचारायचो, ‘तू समजून घ्यायला गणितासारखा विषय आहेस का?’ गणित म्हटले की आकडेमोड आली. या विषयाने कोवळे बालपण खाऊन टाकले. पाचवीला पूजल्यासारखेच की पाचवी इयत्तेपासून पाठी लागले, त्याने नोकरीतसुद्धा पाठ सोडली नाही.

एक सहकारी पट्टीचा खवैया. चवीने खाणारा, असा त्याचा प्रामाणिक दावा. ‘पुरी भाजी खातें समय....पुरी को पटक पटक के खाओ.... ताकी ऑइल निकल जाये।’ तर या सहकाऱ्याचा गाता गळा होता. गाण्याची खूपच आवड होती. कामातही हुषार. पण, स्वत:ला योग्यतेप्रमाणे काम मिळाले नाही, अशी त्याची धारणा होती. काही काळ वकिलीचा अभ्यासही केलेला होता महाशयांनी. आहे त्यात रमायचा प्रयत्नही करायचा नाही. या मित्राची बदली पुण्याला झाल्यापासून काही संपर्क नाही. ना चिठ्ठी... ना चपाटी.... ना कधी एखादा फोन. पुण्यात आल्यावर त्याची प्रकर्षाने आठवण आली.
कधी भेटलाच, तर सांगा मो.दि. आता पुण्यात आलाय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mohan gokhale