तो प्रवास सुंदर होता!

मोहन साळवी
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

ते कुटुंब जर्मनीत राहणारे, पण त्यांची छोटी मुले उत्तम मराठीत बोलत होती. त्यांचे ते मराठी बोल ऐकत केलेला तो प्रवास सुंदर होता.

ते कुटुंब जर्मनीत राहणारे, पण त्यांची छोटी मुले उत्तम मराठीत बोलत होती. त्यांचे ते मराठी बोल ऐकत केलेला तो प्रवास सुंदर होता.

पुणे-हैद्राबाद शताब्दी एक्‍सप्रेसने सोलापूरला निघालो होतो. एक जोडपे आपल्या साधारणपणे पाच व सात वर्षांच्या मुलांसहित समोरच बसले होते. त्यांच्याकडच्या सामानावर विमान प्रवासाची लेबले होती. ते जर्मनीतून आले होते. पण ते जोडपे व त्यांची दोन्ही मुले चक्क मराठीत बोलत होती. उच्चार शुद्ध होते. ते बोलणे ऐकून मी आश्‍चर्यचकित झालो. चौकशी करता समजले की, ते कुटुंब जर्मनीत स्थायिक झाले आहे. हैद्राबादला आपल्या आई-वडिलांना भेटायला ते चालले होते. तेवढ्यात मुलीने विचारले, ‘‘बाबा, आपण आजी-आजोबांच्या घरी किती वाजता जाऊ?’’ त्यावर त्यांनी दुपारपर्यंत जाऊ असे सांगितले. ‘‘आपली मुले इतके सुंदर मराठीत कसे बोलतात?’’ या माझ्या उत्सुक प्रश्नावर ते सद्‌गृहस्थ उत्तरले, ‘‘मी मुळचा हैद्राबादचा. माझी बायको पुण्याची. पुण्यात शिक्षण घेत असताना आमची ओळख झाली. आम्ही विवाह केला. योगायोगाने आम्हा दोघांना जर्मनीत नोकरी मिळाली. त्या वेळी आम्ही दोघांनी निश्‍चय केला की, आपली परंपरा व संस्कृती जपण्यासाठी आपण घरामध्ये आपापसात मराठीत बोलायचे व अपत्य झाल्यावर त्यांच्याशीदेखील मराठीतच बोलायचे. आमची दोन्ही मुले जर्मनीत जन्मली आहेत. त्यांच्याशी अगदी लहानपणापासून मराठीतून बोलू लागलो. याचे कारण आम्ही भारतात येऊ त्या वेळी त्यांना आपल्या नातेवाईकांशी, आजी-आजोबांशी सहजपणे संवाद साधता यावा. आपुलकी व प्रेम वाढावे, हा उद्देश होता. कारण इकडे आल्यावर नातेवाईक व मुले यांच्यातील संवादात दुभाषाचे काम करणे आम्हां दोघांनाही पसंत नव्हते.’’ तेवढ्यात मुलांनी गोंधळ केला. आई रागावली तेव्हा मुलाने आठवण करून दिली की, ‘‘आई, तूच म्हणालीस, इकडे मराठीत बोलायचे.’’ आईने चूक कबूल केली. म्हणाली, ‘‘मुलांना आपल्या देशाची ओळख, संस्कृती व परंपरा माहीत असावी, नातेवाईकांशी, दोन्हीकडच्या आजी-आजोबांशी मनमोकळेपणाने बोलता यावे, म्हणून त्यांना मराठी संस्कारातून वाढवीत आलेलो आहोत.’’ एवढ्यात सोलापूर आले. मी माझी बॅग घेऊन उतरण्यासाठी उठलो. तेवढ्यात त्या दोन्ही मुलांनी ‘काका’ म्हणत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. ‘‘काका, आपण पुन्हा भेटूया.’़’ असे ती मुले म्हणाली. तेव्हा मीही मनापासून त्यांना आशीर्वाद दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mohan salvi