म्हातारपण दे गा देवा!

मोरेश्‍वर गर्दे
शनिवार, 27 जुलै 2019

बालपण दे गा देवा सगळेच म्हणतात आणि म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच की!

बालपण दे गा देवा सगळेच म्हणतात आणि म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच की!

एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावरून दोन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्याला स्थायिक झालो. थोडी पुस्तके लिहायचा बेत होता, पण गेली पंधरा वर्षे इतके भिन्न भिन्न प्रकारचे काम मिळत गेले, की त्यातच पूर्णपणे मग्न राहिलो. निवृत्ती घेऊनही हातून एकही पुस्तक लिहिले गेले नाही. या दरम्यान, संपादक, संचालक, प्राध्यापक, सल्लागार अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे समाधान मात्र नक्कीच मिळाले. वयाच्या पंचाहत्तरीच्या जवळ कसा पोचलो ते कळलेच नाही. असे म्हणतात, की आपणच आपल्या वयाचे मोजमाप करायचे असते. पोस्टातील वरिष्ठ नागरिकांची रांग, बसमधील राखीव जागा या सर्व सवलतींचा लाभ घ्यावासा वाटत नाही, अजूनही हे महत्त्वाचे.

म्हातारपण कसे घालवावे याचे अनेक धडे आधीच्यानी सांगून ठेवले आहेत. समाजकार्य, स्नेहसंमेलने, वाचन, प्रवास, संगीत आणि इतर आवडते छंद यात वेळ छान जातो. परवाच एक मित्र म्हणाला, "आजारी पडायला आपण काय तरुण आहोत का?'' म्हातारपणाला "दुसरे बालपण' असेही म्हटले जाते. थोडा आहार, थोडा व्यायाम, तसेच मीठ, साखर व तेल यावर नियंत्रण, कोडी सोडवणे, समारंभामध्ये हजेरी या सर्वांतून म्हातारपण म्हणजे सुख-समाधानाचा काळ होऊ शकतो. एक गृहस्थ सत्तराव्या वर्षी एल.एल.बी. झाले आणि मृत्यूपत्र कायदेशीरपणे लिहिले. जे. कृष्णमूर्ती म्हणतात "मरेपर्यंत आनंदाने जगा!' एक प्रसिद्ध गृहस्थ सत्याऐंशीव्या वर्षी मरण पावले. शेवटच्या दिवशीही त्यांचा पोहणे, न्याहरी, संगणक, दुपारची झोप व संध्याकाळचा चहा असा दिनक्रम पूर्ण झाला होता. एक तत्त्वज्ञान असेही आहे की "जीने के लिये मरना हो, तो सब कुछ है जिंदगी!' शेवटी असेच म्हणावे लागेल की, "न हसणारा वृद्ध, तो एक मूर्ख'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by moreshwar gadre