अस्वल आहारासि आले

मृदुला गर्दे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

त्या काळोखात भले थोरले अस्वल उभे होते. आहार शोधत जंगल सोडून रिसॉर्टपर्यंत पोचले होते.

त्या काळोखात भले थोरले अस्वल उभे होते. आहार शोधत जंगल सोडून रिसॉर्टपर्यंत पोचले होते.

रात्रीचा साधारण दहाचा सुमार. कॅनडातील केलोना या एका रमणीय रिसॉर्टवर मुलाने व त्याच्या मित्राने तीन-चार दिवस बुकिंग केले होते. सर्वत्र घनदाट झाडी, एका बाजूला उंच डोंगर व खालच्या बाजूला मोठे पसरलेले सरोवर. हा रिसॉर्ट बघून कोणाचेही मन हरखून जावे. दहा-बारा वर्षांची तीन-चार मुले व आम्ही मोठे सहा-सात जण होतो. सबंध रस्ताभर मुलांची अखंड बडबड, थट्टामस्करी चालू होती. मुक्कामाला पोचल्यावर आमच्या खोल्या ‘शोधण्याचे’ काम सुरू केले. रिसॉर्टवर दिवे होते. पण, झगमगाट नव्हता. त्यामुळे खोल्या जरी दिसत असल्या, तरी त्यांवरील नंबर दिसत नव्हते. माझे मिस्टर एका बाजूला व चिरंजीव त्याच्या मित्राबरोबर दुसऱ्या बाजूला गेले. पण, अक्षरशः दोन-तीन मिनिटांतच ‘हे’ अगदी धीम्या चालीने, निःशब्दपणे परत येताना दिसले. मी ‘‘काय झाले?’’ म्हणून विचारले, तर हातांनीच खाणाखुणा करून न बोलण्याचा इशारा केला.

तेवढ्यात मुलेही आली. आजोबांनी हळू आवाजात सांगितले, ‘‘समोर जाऊ नका. तिकडे भले थोरले ग्रीझली बेअर आहे.’’ पण, ऐकतील तर मुले कसली! ‘‘आजोबा, तुम्ही आमची थट्टा करताय न? अस्वल कसे असेल? एखादा मोठा कुत्रा तुम्ही पाहिला असेल.’’ एवढ्यात मुलगा व त्याचा मित्रही आले. त्यांचाही क्षणभर विश्वास बसला नाही. पण, प्रत्यक्ष जाऊन पाहतात तो काय? जेथे काही मिनिटांपूर्वी ‘हे’ उभे होते तेथून अक्षरशः चार-पाच फुटांवर एक महाकाय ग्रीझली खरेच उभे होते आणि तोंडाने विचित्रपणे ‘गुर्रर्र गुर्रर्र’ आवाज काढीत मुलांकडे बघत होते. क्षणार्धात सगळी मुले सशासारखी बिळात जाऊन लपली! जर ह्यांनी त्या वेळी प्रसंगावधान दाखविले नसते तर? अस्वलाने झेप घेतली असती तर? दुसऱ्या दिवशी चौकशी करता कळले, की ही जंगली अस्वले अधूनमधून भर रात्री रिसॉर्टवर फेरी मारतात व खाद्य शोधतात. पर्यटकांनी निष्काळजीपणे खाऊन उरलेल्या पदार्थांची पिशवी बंद डब्यात न टाकता बाहेर ठेवली असली की त्यांना आयते अन्न मिळते. म्हणून यांना ‘गार्बेज बेअर’ असे नाव पडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mrudula gadre