ज्येष्ठांची काठी

नाना भेडसगावकर
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

सध्याच्या जमान्यात मोबाईल ही ज्येष्ठांची काठी आहे असे वाटते. त्याचा सर्वतोपरी वापर करायला शिकायला हवे.

सध्याच्या जमान्यात मोबाईल ही ज्येष्ठांची काठी आहे असे वाटते. त्याचा सर्वतोपरी वापर करायला शिकायला हवे.

तसा मी निवृत्तीच्या वयाचा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मोबाईल वापरणे हे मला एक फॅड वाटायचे. पण त्यातल्या अनेक सोयी आणि मनोरंजन लक्षात घेता हळूहळू मी मोबाईल वापरू लागलो. आणि ऑनलाईन कामाच्या सोयीबरोबर निवृत्त ज्येष्ठ माणसांसाठी ही एक चांगली करमणूक आहे हेही माझ्या लक्षात आले. एक अनुभव सांगावासा वाटतो. नुकतेच माझ्या बहिणीचे यजमान आपले कर्तव्य-परिपूर्ण आयुष्य जगून काळाच्या पडद्याआड गेले. ते गेल्यावर माझी ऐंशी वर्षांची बहीण खूप सैरभैर झाली. खरे तर तिच्या घरातली सगळी माणसे तिची काळजी घेणारी, तिला सोबत करणारीच आहेत. पण यजमान असताना त्यांच्या संगतीत व त्यांची सेवा सुश्रुषा करण्यात तिचा सगळा वेळ जायचा. आता तोच वेळ तिला त्रासदायक ठरू लागला. माझ्या लक्षात आले, की हिला मोबाईलची सोबत दिली व वापरायला शिकवला तर बाबूजी-गदिमांची गाणी, गीतरामायण, राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या मुलाखती, नाट्यसंगीत हे ऐकण्यात व पाहण्यात हिचा वेळ खूप छान जाईल.

वास्तविक यापूर्वीही तिच्या नातवाने तिला मोबाईल शिकवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या वेळी यजमान असताना तिला या कुठल्याच गोष्टीचे तसे महत्त्व वाटत नव्हते. म्हणून तिने त्यात फार लक्ष घातले नाही. पण आता मी घरातलाच, मुलाचा वापरलेला मोबाईल तिला दिला. तिला साध्या साध्या गोष्टी कशा पाहायच्या ते शिकवले आणि हिला जमेल न जमेल असा विचार करत असताना दुसऱ्याच दिवशी उत्साहाने तिचा फोन आला. ‘‘भाऊ, आता मला गाणी, नाटक, सिनेमा, मुलाखती पाहायला छान जमायला लागले. काल दिवसभर माझा वेळ छान गेला.’’ हे ऐकल्यावर मला खूप आनंद झाला. वाटले, मोबाईल ही मुलांच्या दृष्टीने एक चिंतेची बाब झाली हे खरेच; पण ज्येष्ठांना मात्र ‘आनंदाची कुपी’ म्हणायला हवी. ज्येष्ठांची काठीच जणू!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by nana bhedasgaonkar