धन्यवाद दाभाडेदादा

पंकज कुलकर्णी
Friday, 3 January 2020

झाडे लावण्याच्या उत्साहाबरोबरच ती वाढवण्यासाठीही धडपड करावी लागते. ऐन उन्हाळ्यात झाडे जगवावी कशी या काळजीत असतानाच दादा धावून आले.

झाडे लावण्याच्या उत्साहाबरोबरच ती वाढवण्यासाठीही धडपड करावी लागते. ऐन उन्हाळ्यात झाडे जगवावी कशी या काळजीत असतानाच दादा धावून आले.

एखाद्या कामात मदत मिळाली आणि तीही शासकीय किंवा नगरविकास यंत्रणेची तर तुमचाही उत्साह वाढेल ना? माझाही उत्साह खूपच वाढला. त्याला कारणही तसेच घडले. गेली चार-पाच वर्षे मी आणि माझे कुटुंबीय वेताळ टेकडीवर रोपे लावून त्यांची काळजी घेत आहोत आणि शंभरावर रोपे छान वाढू लागली आहेत. टेकडीवर असलेली खासगी जागा लक्षात न आल्यामुळे काही रोपे त्या जागेत लावली गेली. मग पुन्हा वाढलेल्या झाडांची जागा बदलावी लागली. जवळ पाण्याची सोय नाही. दोन-तीन वेळेस मी खासगी टॅंकरची सोय केली. पण दर वेळेस ते जमणार नव्हते. मला काळजी लागून राहिलेली असताना उद्यान विभागाच्या पाण्याच्या गाडीचे चालक दाभाडेदादा मला टेकडीवर भेटले. ते टेकडीवर टाक्‍या भरण्यासाठी आले होते. त्यांचा हसरा आणि प्रसन्न चेहरा बघूनच माझी काळजी कमी झाली.

या झाडासाठी काही टाक्‍या मी हलवून घेतल्या आणि इतक्‍या अडचणीतून वाट काढत दाभाडेदादांनी टॅंकर टाक्‍यांच्या जवळ पोचवला की मी थक्कच झालो. ती वेळ इतकी महत्त्वाची होती ना की मी त्यांना हातच जोडले. त्या वेळेस त्यांनी टाक्‍या भरून दिल्याच; पण उन्हाळ्यातील चारही महिने दाभाडेदादा दर शनिवारी टाक्‍या भरून देत होते. एक शनिवार चुकला नाही. आणि या सद्‌गृहस्थाने चहासाठीही पैसे घ्यायला नकार दिला. हे तर अगदी ‘झाडासारखे’ झाले. आपल्याकडील सगळे देऊन मोकळे व्हायचे, पण अपेक्षा कसलीही नाही. त्यांच्यामुळे रोपांना पाणी घालणे खूपच सोयीचे झाले आहे. टाक्‍या भरत असताना दादांना टेकडीवरील बाकीच्या टाक्‍या भरण्यासाठीही फोन येत असतात आणि हसतमुख दादा त्यांचीही अडचण दूर करतात. यावर्षी टेकडीवरील वृक्षारोपण कार्यक्रमात दादांचा छोटासा सत्कार केला. पावसाळा संपल्यावर यावर्षीही त्यांची चक्कर सुरू झाली. या झाडांसाठी जी मदत झाली त्याबद्दल उद्यानविभागाच्या सगळ्यांचे आभार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by pankaj kulkarni