ओळख

muktapeeth
muktapeeth

आपल्याला स्वतःची ओळख नसते. आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या आधारावरच ओळख निर्माण होते.

आपल्या अवतीभवती अनेक माणसं असतात, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, त्यांच्यासह आपण अनेक वर्षे जगत असतो. त्या सगळ्यांच्या मनात आपली एक प्रतिमा, ओळख तयार झालेली असते. कुठलाही अर्ज भरताना स्वतःची ओळख देताना, ‘गृहिणी’ अशी लिहिताना माझी लेखणी नेहमी अडखळते, गृहिणी लिहिणं कमीपणाचं वाटतं म्हणून नाही; तर त्या पदाला योग्य न्याय दिल्यासारखं वाटत नाही म्हणून. गृहिणीपद सांभाळणं हे खूपच जिकिरीचं, जबाबदारीचं आणि जोखमीचं काम आहे आणि अवघड काम आहे. शिवाय, हा Thankless job आहे.

मी अनेकदा व्यवसायलेखन, संपादन असा लिहिते, फारसा फायदेशीर नसला ती माझी ओळख मला अधिक प्रामाणिक वाटते. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षापासून मी कविता लिहितेय; पण पुढे कवयित्री ही माझी ओळख बनेल असं मला वाटलं नव्हतं. त्यासाठी माझा फारसा अट्टहासही नव्हता. कविता लिहीत गेले, प्रकाशित होत गेल्या... निमंत्रणं येत गेली! कवयित्री म्हणून जगणं स्वतःला आनंद देणारं असलं, तरी अवतीभवतीच्या लोकांचा कुचेष्टेचा विषय असतो, ‘यांसारख्या बाहेरच जातात... कधीपण यांची कविसंमेलनं सुरू असतात’

तुम्ही लेखक किंवा कवी म्हणून जगत असता, त्या पदाचा तुम्हाला राजीनामा देता येत नाही. तुम्ही तुमच्या गुणवत्तेवर प्रवाहात टिकून राहता! एका कौटुंबिक कार्यक्रमाहून घरी परतत असताना, एका गणपतीच्या देवळाच्या पायरीजवळ बसले होते. तिथून एक अनोळखी बाई चालल्या होत्या, त्या म्हणाल्या, ‘तुम्ही प्रभा सोनवणे ना?’ म्हटलं, ‘हो!’ यावर त्या म्हणाल्या, मी तुमचे लेख वाचते नेहमी. वर्तमानपत्रात आणि मासिकातही, म्हणून म्हटलं बोलावं तुमच्याशी,’ मी त्यांचं नाव विचारलं, त्या अपर्णा कुलकर्णी नावाच्या शिक्षिका होत्या!

हा एक छोटासा प्रसंग...पण कुचेष्टा, खच्चीकरण करणाऱ्यांपासून असे प्रसंग खूप दूर घेऊन जातात. जगण्याचं बळं देतात, स्वतःशी स्वतःची नव्यानं ओळख करून देतात... नव्हे ती एक परिपूर्तीच असते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com